धक्कादायक; फेसबुकने प्रेमिका झालेल्या तरुणीवर ड्रायव्हरने केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 PM2021-06-25T16:18:58+5:302021-06-25T16:32:06+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : फेसबुकवर मैत्री झाली त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सोलापुरातील तरुणीच्या घरी येऊन अत्याचार केला अन लग्नास नकार दिला. याप्रकरणी एका ड्रायव्हरवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ गोरख साळुंखे (रा. जावळा आंबिका वस्ती, ता. सांगोला) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सोलापुरातील एका तरुणीची सोमनाथ साळुंखे याच्यासोबत मार्च व एप्रिल २०१९ मध्ये ओळख झाली होती नंतर दोघे मोबाईलवर एकमेकांना मेसेज करू लागले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर एकमेकांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. दरम्यान, सोमनाथ साळुंखे याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे म्हणाला तेव्हा पीडित तरुणीने मी मागासवर्गीय समाजाची आहे. त्यामुळे आपल लग्न होऊ शकणार नाही, असे सांगितले. मात्र, साेमनाथ साळुंखे याने मी जात पहात नाही. तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे, असे म्हणाला.
२०१९ मध्येच एकेदिवशी तो भाडे घेऊन सोलापूरला येत असल्याचे सांगितले. तरुणीने घरी येऊ नकोस म्हटले असतानाही तो आला. नेमके त्या दिवशी तरुणीच्या घरातील लोक परगावी गेले होते. तो घरी आला व रात्री तेथेच मुक्काम करतो, असे म्हणाला. तरुणी नको म्हणत असताना त्याने माझ्यावर विश्वास ठेव, असे म्हणत घरात राहिला. रात्री जबरदस्तीने अत्याचार करून तो पहाटेच्या सुमारास निघून गेला. त्यानंतर त्याने अनेकवेळा अत्याचार केला. लग्न केव्हा करणार? अशी विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. पीडित मुलगी शेवटी घरी गेली असता त्याचे आई वडील व भावाने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. सोमनाथ साळुंखे, वडील गोरख साळुंखे, लता साळुंखे, सचिन साळुंखे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे करत आहेत.
पुण्यात जॉबला असतानाही केला अत्याचार
पीडित मुलगी पुण्यात एका कंपनीमध्ये कामाला लागली तेव्हा तो तेथे जाऊन राहात होता. तिच्याकडून वेळोेवेळी एक लाख रुपये घेतले होते. तेथेही तो लग्न करणार आहे असे सांगून अत्याचार करत होता. एकदा तुळजापूर येथेही नेऊन अत्याचार केला होता, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी साेमनाथ साळुंखे व त्याची आई, वडील व भावालाही अटक झाली होती. सोमनाथ अद्याप जेलमध्ये आहे.