धक्कादायक; बँकांच्या व्याजापोटी दरमहा दूध संघ मोजतोय १८ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 01:09 PM2020-08-27T13:09:47+5:302020-08-27T13:09:57+5:30
उत्पन्न कमी अन् खर्च अधिक; संकलन कमी असल्याचाही तोटा
सोलापूर : बँकांच्या कर्जाचे दरमहा १८ लाख रुपये व्याज तसेच इतर खर्चासाठीचा बोजा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वाढत आहे. उत्पन्न कमी अन् खर्च अधिक यामुळे संघाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
एकेकाळी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध संकलन प्रतिदिन चार लाख लिटरपेक्षा अधिक होत होते व हेच दूध महानंदमार्फत राज्यात पुरवठा होत होते. यामुळे संघ नफ्यात होता. केवळ दूध संघावर जिल्ह्यातील अनेकांचे राजकीय बस्तान बसले आहे. अनेक शेतकºयांची कुटुंबं गाईच्या दुधात स्थिरस्थावर झाली; मात्र यातून स्पर्धा व राजकीय नेत्यांनी खासगी संघ सुरू केले. गावपातळीवरील याच सहकारी दूध उत्पादक संस्था खासगी संघाला दूध पुरवठा करीत आहेत. या राजकीय नेत्यांच्या खासगी संघांचे दूध आता राज्यभरात पुरवठा होत आहे. यामुळे राज्यभरातील सहकारी दूध संघांच्या संकलनावर कमालीचा परिणाम झाला आहे.
अशीच स्थिती सोलापूर जिल्हा दूध संघाची आहे.
संकलन होणाºया दुधाची विक्री कशी करायची हा प्रश्न सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर आहे. पॅकिंगमधून होणारी विक्रीही खासगी संघांच्या स्पर्धेत कमी झाली. शासनाने दूध खरेदी दरासाठी काढलेले आदेश सहकारी संघाला पाळणे बंधनकारक आहे; मात्र खासगी संघ स्वत: दर ठरवितात. सोलापूर जिल्हा संघ प्रतिलिटर २५ रुपयाने व खासगी संघ हेच दूध १८-२० रुपयाने खरेदी करून विक्री करीत आहेत. असा प्रकार चार- पाच वर्षांपासून सुरू आहे. याचा परिणाम सोलापूर जिल्हा दूध संघाच्या उत्पन्नावर झाला आहे.
जिल्हा संघाने एचडीएफसी बँकेचे २० कोटी व मनोरमा बँकेचे एक कोटी रुपये कर्ज काढले आहे. याचे दरमहा १८ लाख रुपये व्याज भरावे लागते. याशिवाय नियमित खर्च व इतर बोजा पडत आहे. उत्पन्न कमी अन् खर्च अधिक अशी स्थिती असल्याने जिल्हा संघ अधिक तोट्यात जात आहे.
अनुदान योजनेमुळे संकट शासनाचे आदेश सहकारीप्रमाणे खासगी संघांसाठी बंधनकारक पाहिजे असे दूध संघांच्या ज्येष्ठ संचालकाने सांगितले. आम्हाला २५ रुपयाने दूध खरेदी करण्यास बंधनकारक करायचे व खासगी संघांनी त्यांना पाहिजे तो दर द्यायचा हे राज्यात सुरू आहे. अनुदान योजना सुरू करायची; मात्र अनुदानाची रक्कम वेळेवर द्यायची नाही. याचा फटका बसत असल्याचे ज्येष्ठ संचालकाने सांगितले.
शासनाचे दूध धोरण दूध संकलन करणाºया प्रत्येकासाठी समान हवे. तरच सहकारी संघ टिकणार आहेत. सोलापूर जिल्हा संघाचे संकलन प्रतिदिन दोन लाख लिटर झाले व महानंदने हे दूध खरेदी केले तरच संघ व शेतकरी टिकणार आहेत. शासनाने शेतकरी समोर ठेवून दूध धोरण ठरवावे.
- राजेंद्रसिंह राजे-भोसले, संचालक, सोलापूर दूध संघ