धक्कादायक! फी न भरल्याने मराठी, इंग्लिशचा पेपर बुडाला, 'निर्भया'मुळे आता पुढील परीक्षा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:31 PM2022-03-21T17:31:16+5:302022-03-21T17:32:10+5:30
घरगुती अडचणीमुळे मी शाळेकडे परीक्षा फी जमा केली नाही
सोलापूर - जिल्ह्याच्या पंढरपूर शहरातील एका विद्यार्थीनीने फी न भरल्याने तिला इयत्ता 10 वीचे पेपर देऊ न दिल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे. त्या विद्यार्थीनीचे मराठी, इंग्रजी विषयाचे पेपर बुडाले असून निर्भया पथकाने लक्ष दिल्याने आता तिला हिंदीसह यापुढील पेपर देता येणार आहेत.
घरगुती अडचणीमुळे मी शाळेकडे परीक्षा फी जमा केली नाही. यामुळे शाळा प्रशासनाने मला फी भरली नाही, यामुळे तुला दहावीचीपरीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ओळखपत्र दिले जाणार नाही, असे सांगितले होते. यामुळे ती मराठीच्या पेपरला शाळेत गेलीच नाही. परंतु, इंग्लिश विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वीच तिने ही घटना पंढरपूर निर्भया पथकाला सांगितली. तत्काळ संबंधित शाळेमध्ये विद्यार्थिनीला परीक्षा देता यावी, यासाठी पोलीस कर्मचारी यांच्यासोबत विद्यार्थिनीला पाठवले. या परीक्षेला जाण्यास पंधरा मिनिटे उशीर झाल्याचे कारण सांगून त्यामुळे पेपर देता येणार नाही, असे शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी शिक्षण विभागाला संपर्क करून त्या परीक्षा सेंटरला भेट देण्यास सांगितले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मारुती लिगाडे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधित प्रकाराची माहिती घेतली व पुढील पेपरला काही अडचण आल्यास मला फोन करा म्हणून सांगितले. या गोंधळातही त्या विद्यार्थिनीला इंग्रजी विषयाची परीक्षा देता आली नाही. परंतु, किमान इतर विषयांचे परीक्षा पेपर संबंधित मुलीला देता येणार आहेत. यामुळे तिच्या आईवडिलांनी निर्भया पथकाचे आभार मानले.
फीसाठी विद्यार्थिनीला परीक्षेस बसू न देण्याची तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंढरपूर शिक्षण विस्तार अधिकारी मारुती लिगाडे हे शाळेत गेले होते. त्या विद्यार्थिनीला यापुढे परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर त्या शाळेची चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमण्यात येईल. गटशिक्षण अधिकाऱ्यांनादेखील त्या शाळेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी, त्यांच्या पालकांनी तालुका शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
- भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर