धक्कादायक; सोलापूर शहरातील आठ रुग्णालयांकडे अग्निशमनची एनओसीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 02:12 PM2021-01-15T14:12:42+5:302021-01-15T14:22:10+5:30
वर्षाला होते नूतनीकरण : आरोग्य विभागाकडून केला जातो अर्ज
संताजी शिंदे
सोलापूर : शहरात एकूण ३२५ रुग्णालये आहेत, त्यापैकी २०४ जणांनी अग्निशामक दलांची नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतली आहे. तर अद्याप आठ रुग्णालयाने घेतली नसल्याचे समोर आले आहे.
अग्निशामक यंत्रणा लावण्यासाठी रुग्णालयांना आरोग्या विभागाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर तो अर्ज अग्निशामक दलाकडे जातो. अग्निशामक दलाचे अधिकारी रुग्णालनात जाऊन तपासणी करतात व त्याचे नाहरकत प्रमाणपत्र देतात. ही यंत्रणा सतत कार्यन्वित राहण्यासाठी दर वर्षाला त्याचे नूतनीकरण करून घेतली जाते. ज्या ठिकाणी रुग्ण ॲडमिट केले जातात तेथे सक्तीने ही यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. नर्सिंग ॲक्ट खाली ही परवानगी दिली जाते. स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकल सिस्टीम बसविणे आवश्यक आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बसवल्यास आग नियंत्रणात राहते, शिवाय जीवितहानी होत नाही. आग लागल्यानंतर प्रथम काळजी घेणे गरजेचे आहे.
अग्निशामक दलाच्या वतीने दरवर्षी हॉस्पिटलमध्ये कार्यशाळा घेतली जाते. तेथील कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देऊन सावध कसे रहायचे याची माहिती दिली जाते. उन्हाळ्यात जास्तकरून आग लागण्याचे प्रमाण जास्त असते. शॉटसर्किटच्या घटना घडून नुकसान होण्याची शक्यता असते. याबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून अग्निशामक दलाच्या वतीने प्रात्यक्षिके केली जातात. आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशामक दलास कळविल्यास पथक तत्काळ घटनास्थळी पोहते आणि पुढील धोका टळतो.
सरकारी रुग्णालयांकडेही आवश्यक एनओसी नाही
शासकीय रुग्णालयाने याबाबत एनओसी घेतली नाही. त्या ठिकाणी दोन तीन वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर दवाखाना येथे अग्निशामक दलाची यंत्रणा बसण्यात आली आहे. भावनाऋषी, दाराशा व चाकोते प्रसूतिगृहात अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे.
वर्षभरापूर्वीच घडला असा प्रसंग
शिंदे चौकातील डिसेंबर २०१९ मध्ये एका खासगी हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर एमईसीबीच्या मीटरमध्ये शॉटसर्किट झाला होता. त्यामुळे आग लागून हॅास्टिलमध्ये धूर झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. खाली लागलेली आग पाण्याचा मारा करून विझवली होती. यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कर्मचाऱ्यांचे जीव वाचले.
एनओसी न घेतलेल्या रुग्णालयांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल. खासगी हॉस्पिटल चालकांनी दरवर्षी अग्निशामक दलाकडून यंत्रणेचे नूतनीकरण करून घ्यावे. आग लागल्यास तत्काळ अग्निशामक दलाच्या १०१वर संपर्क साधावा.
- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशामक विभागप्रमुख