धक्कादायक; वाळीतच असे टाकले की, भावानेही आजारी आईला भेटू नाही दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 04:14 PM2021-08-05T16:14:53+5:302021-08-05T16:14:59+5:30
जात पंचायतीवर आरोप : सोलापूरच्या चार पंचांना केली अटक
सोलापूर : पती-पत्नीचा वाद झाला.. त्यानंतर समाजातील जातपंचायतीने त्या पतीसह त्याच्या तीन मुलांना तीन वर्षांपासून वाळीत टाकले. त्यातच भावाने आजारी आईला भेटू दिले नाही. त्यामुळे पती शरणीदास पांडुरंग भोसले (वय-४०, रा. सांगली) यांनी तीन वर्षांनंतर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार जातपंचायतीतील चार पंचांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
धोंडिबा शिंदे पाटील, अशोक शिंदे पाटील, नाना शिंदे पाटील, संतोष रा. शिंदे, उत्तम शिंदे (सर्व, रा. न्यू शिवाजीनगर, गोंधळे वस्ती, अक्कलकोट रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पंचांची नावे आहेत. शरणीदास भोसले यांचा विवाह २००३ मध्ये माया ननवरे यांच्याशी झाला होता. त्यानंतर २०१३ साली शरणीदास यांच्या पत्नी माया या आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर अनेकवेळा कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी समजूत घातल्यानंतर त्या पुन्हा नांदायला आल्या. पण, वारंवार भांडण करून त्या माहेरी जात होत्या. २०१८ मध्ये माया यांनी शरणीदास यांना समाजातील पंचांसमोर उभे केले. रा. धोंडिबा शिंदे पाटील, अशोक शिंदे पाटील, नाना शिंदे पाटील, संतोष रा. शिंदे, उत्तम शिंदे यांनी पंच म्हणून आपली भूमिका मांडली.
ही भूमिका मांडत असताना पंचांनी शरणीदास यांचे न ऐकता फक्त त्यांच्या पत्नीचे ऐकत शरणीदास यांच्यासह त्यांच्या तीन मुलांना जातीतून बाहेर काढले आणि वाळीत टाकले. फिर्यादी तेथून बाहेर येत असताना पंच म्हणून उपस्थित असलेले अशोक शिंदे यांनी तुझ्या पत्नीला नांदायला पाठवतो, यासाठी तू दोन लाख रुपये दे, अशी मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तेव्हापासून आजपर्यंत फिर्यादी व त्यांच्या तीन मुलांना समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास सचिन माळी हे करत आहेत.
वाळीत टाकण्याची भावालाही भीती
जातपंचायतीने आपल्याला वाळीत टाकले आहे, याचे मला जास्त वाईट वाटले नाही. पण, सहा महिन्यांपूर्वी आईची तब्येत बिघडल्यामुळे दुसऱ्या भावाकडे असलेल्या आईला पाहण्यासाठी गेल्यानंतर लहान भावाने ‘तू आमच्याकडे येऊ नकोस, तुझ्यामुळे आम्हालाही समाज वाळीत टाकेल’, असे म्हणत भीतीपोटी त्यानेही आम्हाला झिडकारले. यामुळे आजारी आईलाही पाहू न शकल्याचे मला जास्त वाईट वाटले. म्हणून मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत तक्रार दाखल केल्याचे शरणीदास भोसले यांनी सांगितले.