धक्कादायक; तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करूनही ऑक्सिजनची गरज भागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:49 PM2021-04-19T13:49:15+5:302021-04-19T13:50:27+5:30
लिक्विड नसल्याने उत्पादन कमी : फोन वाजला की ऑक्सिजनचीच होते विचारणा
सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. होटगी रोड येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करूनही ऑक्सिजनची गरज भागत नसून अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत.
जिल्ह्यामध्ये सध्या एकूण चार ठिकाणाहून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यातील दोन ठिकाणी ऑक्सिजन हे लिक्विडवर अवलंबून आहेत. पुणे येथून ऑक्सिजन लिक्विड येते. तिथेच अधिक गरज पडत असल्याने सोलापुरात गरजेपेक्षा कमी प्रमाणात लिक्विड पुरवठा होत आहे. कोरोनाच्या आधी असलेल्या मागणीशी तुलना करता आता पाचपटीने अधिक ऑक्सिजनची गरज पडत आहे. आधीपासून ज्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवले जात होते, त्यांना देणे शक्य होत असून नव्या रुग्णालयांना ऑक्सिजन देणे शक्य होत नाही.
असा होतो तयार
सोलापुरात ऑक्सिजन दोन पद्धतीने तयार होतो. एक ऑक्सिजन लिक्विडद्वारे तर दुसरा थेट हवेतून केला जातो. पुण्यातील कंपनी टँकरद्वारे लिक्विड स्वरूपात सोलापुरातील दोन कंपन्यांना ऑक्सिजन देते. हे ऑक्सिजन वायू स्वरूपात रूपांतरित करून ते सिलिंडरमध्ये भरून दिले जाते. दुसऱ्या पद्धतीत काॅम्प्रेसरद्वारे हवा खेचून त्यातून ऑक्सिजन व नायट्रोजन वेगळे केले जाते. प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजनची गुणवत्ता तपासली जाते. तसेच ऑक्सिजन भरण्यासाठी सिलिंडरची योग्यताही तपासण्यात येते. त्यानंतर सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून रुग्णालयाकडे पाठविण्यात येतो.
चार महिन्यांपूर्वी आम्ही ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा केला. आधी दोन शिफ्टमध्ये काम करत होतो. आता तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करत आहोत. अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने पुरठ्यावर मर्यादा येत आहेत.
- उजेफ शेख, ऑक्सिजन पुरवठादार
आम्ही जास्त वेळ काम करून ऑक्सिजन पुरवठा करण्यास तयार आहोत. पण, ऑक्सिजन लिक्विड खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. रुग्णालयांनी गरजेपुरतेच ऑक्सिजन घ्यावे, ऑक्सिजन वाया जाऊ न देण्याची काळजी घ्यावी.
- शेषगिरी देशपांडे, ऑक्सिजन पुरवठादार