धक्कादायक; उपवासाच्या पदार्थामुळे वाढेल रक्तात साखर अन् पोटात पित्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:48 AM2021-10-08T11:48:26+5:302021-10-08T11:48:32+5:30
आहार तज्ज्ञांचा सल्ला : साबुदाणा, वेफर्सपेक्षा फळांचा आहार घेण्याचा सल्ला
सोलापूर : नवरात्र सुरू होताच सण-उत्सवांचा उत्सव सुरू होतो. तसेच व्रतवैकल्यांसह उपवास मोठ्या प्रमाणात सुरू होते. पण याकाळात उपवासाच्यावेळी चुकीचे आहार घेतल्यामुळे अनेकांना पित्तासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे उपवासाच्या काळात साबुदाणा, वेफर्सपेक्षा फळांचा आहार वाढविला पाहिजे, असे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीत उपवासाला खूप महत्त्व आहे. धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची सांगड पूर्वीपासून घातली गेली आहे. उपवास म्हणजे पचनक्रियेस आराम देणं. यामुळे शरीरास अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, हलकेपणा येतो आणि पर्यायाने उत्साह येतो. साबुदाणा आणि त्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ जसे वेफर्स, वडे आदी पदार्थांमुळे उष्णता, आम्लपित्त वाढणं, पोट बिघडणं, उलट्या होणं असे त्रास होतात. यामुळे उपवास योग्य पद्धतीनं केला, तर आपल्या पचनसंस्थेलाही थोडी विश्रांती मिळते. यामुळे राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार नाही. खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यांसारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा
पण, मधुमेह, उच्च वा कमी रक्तदाब असेल, तर किंवा गरोदर आणि स्तनपान देणारी स्त्री, वयोवृद्धांनी शक्यतो उपवास करू नये, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केला.
थकविणारे व्यायाम टाळा
उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. जर जस्त व्यायाम केल्यास अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते.
असा घ्यावा आहार...
उपवास करताना उपवासाच्या आदल्या दिवशी रोजचा समतोल आहार घ्या. यात राजगिरा पीठ, लाह्या, रताळं किंवा या सर्व पदार्थांची भाजणीपासून बनवलेले पदार्थ दिवसभरात थोडे थोडे खावेत. कडी, लाल भोपळा याची भाजी, कोशिंबीर किंवा रायतं करून खावं. ताजं, गोड दही, ताक, मठ्ठा घ्यावा. फळं आणि सुकामेवा यांचा वापर करावा. असे पदार्थ प्रमाणात आणि विभागून खाल्ल्यानं उपवासादिवशी ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. शिवाय उष्णता आणि पित्तही होत नाही.
जे काही उपवासाचे पदार्थ आहेत. त्यामुळे शुगर वाढते, आणि ॲसिडिटी वाढते, हे जास्त तिखट किंवा मसालेदार करू नये. यासोबत ज्युस, फळे वापरायला पाहिजे. मधुमेह रुग्णांना रताळे, बटाटे खाऊ नये. यामुळे त्यांचे शुगर वाढू शकते. अशा रुग्णांनी उपवास न केलेले बरे. जर केले तर दिवसातून एकदा तरी खावे.
- डॉ. प्रसाद कोरूलकर, फिजिशयन