धक्कादायक; पंधरा हजारांसाठी सोलापूरच्या तरुणाला ११ मजल्यावरून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:46 AM2020-03-11T11:46:30+5:302020-03-11T11:48:30+5:30
पुण्यातील कोंढवा भागातील घटना; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
पुणे : व्याजाने घेतलेले १५ हजार रुपये पैसे परत करण्याच्या वादातून झालेल्या झटापटीत तरुणाला इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून खाली ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार समोर आला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील खडी मशिन चौकात कुल उत्सव ही ११ मजली इमारत आहे़ या सोसायटीच्या ११ व्या मजल्यावर अभिनव व त्याचे मित्र राहतात़ गेल्या १ मार्चपासून सागरही त्यांच्याबरोबर रहायला आला होता़ सागर याने त्यांच्याकडून ९ जानेवारी रोजी १० टक्के व्याजाने १५ हजार रुपये घेतले होते़ तीन महिने झाले तरी त्याने हे पैसे परत केले नव्हते़ यावरून त्यांच्यात सोमवारी रात्री भांडणे झाली़ त्यानंतर ते तिघे जण सागरला दुचाकीवरून घेऊन पहाटे पावणेदोन वाजता कुल उत्सव सोसायटीतील घरी नेले़ तेथील ११ व्या मजल्यावरील घरात गेल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा मारहाण करून ११ व्या मजल्यावरून ढकलून दिले़ आवाज ऐकून सोसायटीचा सुरक्षारक्षक ओंकार येनपुरे तिकडे धावत गेले़ त्यांनी पोलिसांना कळविले.
तीन वर्षांपासून तो पुण्यात राहात होता
सागर चिलवेरी (वय २४, रा़ सोलापूर) असे त्याचे नाव आहे़ तो एका कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करीत होता़ अभिनव जाधव, अक्षय गोरडे व तेजस गुजर (रा़ कुल उत्सव सोसायटी, खडीमशिन चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ हे तिघे जण सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून तीन वर्षांपासून या सोसायटीमध्ये राहात आहेत़ ते मूळचे बीडचे आहेत़