धक्कादायक: अखेर ‘स्वामीं’ चा जातीचा दाखला झाला रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:36 PM2020-01-31T12:36:53+5:302020-01-31T12:43:15+5:30
जात पडताळणी समितीचा निर्णय; तपासलेले पुरावे ठरले फोल
सोलापूर: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सदस्य सचिव संतोष जाधव व सदस्या छाया गाडेकर यांनी महापालिका परिवहन खात्यातील निवृत्त समयलेखक विश्वनाथ स्वामी (मूळ रा. बोरामणी, सध्या: गौरानगर, सोलापूर) यांचा माला जंगम जातीचा दाखला दावा अमान्य केला आहे.
याबाबत परिवहनमधील निवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे ३ डिसेंबर २0१४ रोजी तक्रार केली होती. स्वामी हे परिवहनमध्ये हेल्पर म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनुसूचित जाती अंतर्गत बनावट कागदपत्राआधारे जातीचा दाखला घेऊन परिवहन सेवेमध्ये पदोन्नतीचा लाभ घेतला.
स्वामी हे जंगम समाजाचे इतर मागास प्रवर्गात मोडत असताना त्यांनी माला जंगमचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचे दिसून आले. तसेच त्यांचा भाऊ परिवहन खात्यात व मुलीने शिक्षणासाठी जंगम जातीचे वैधता प्रमाणपत्र घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे विश्वनाथ स्वामी यांचो माला जंगम अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे तक्रारीत नमूद केले होते.
याबाबत कंदकुरे यांनी अर्जासोबत जोडलेले पुरावे पडताळणीसाठी दक्षता पथकाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार दक्षता पथकाने १३ एप्रिल २0१७ रोजी चौकशी अहवाल सादर केला. यात दक्षिण सोलापूर तहसीलदारांनी स्वामी यांना माला जंगमचे दिलले जात प्रमाणपत्र तपासण्यात आले. विद्या निकेतन हायस्कुलच्या दाखल्यावर स्वामी यांची जात हिंदू लिंगायत जंगम असे असल्याचे आढळले. बोरामणी झेडपीच्या शाळेमध्ये त्यांचा भाऊ चन्नवीर याच्या दाखल्यामध्े हिंदू जंगम तर स्वामी यांच्या सेवा पुस्तकात हिंदू लिंगायत अशी नोंद आढळली. त्यांच्या आजोबाच्या खरेदीखतावर नोंद आढळली नाही तर मुलगी पूजा हिला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जंगम (इतर मागास वर्गीय) नावे प्रमाणपत्र दिल्याचे दिसून आले. या अहवालासह समितीने स्वामी यांना त्यांचा जातीचा दावा अवैध का ठरविण्यात येऊ नये अशी नोटीस बजावून खुलासा मागविला. त्यावर स्वामी यांनी लेखी म्हणणे सादर केल्यावर सहा वेळा सुनावण्या घेण्यात आल्या.
परिवहनच्या लाभाचे काय
तक्रारीच्या संबंधाने काही जबाब घेण्यात आले. जंगम व माला जंगम या दोन्ही जाती वेगवेगळ्या असून वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ठ आहेत. त्यामुळे स्वामी यांनी माला जंगम संदर्भात सादर केलेले जात नोंद पुरावे दाव्याच्या पुष्ठ्यर्थ ग्राह्य ठरत नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला. त्यामुळे स्वामी यांनी दिशाभूल करून माला जंगम जातीचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचे स्पष्ट होत असल्याने जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात येत असल्याचा समितीने निर्णय दिला. स्वामी यांनी या जातप्रमाणपत्रावर परिवहनमध्ये पदोन्नतीचा लाभ घेतला. हेल्पर असताना ते समयलेखर, लिपिक, सभापतींचे स्वीय सहायक या पदावर गेले. समय लेखापाल म्हणून नियुक्ती झाल्यावर केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पुन्हा समयलेखक पदावर नेले. आता स्वामी निवृत्त झालेले असून, त्यांनी घेतलेल्या लाभावर परिवन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.