धक्कादायक; लोकांना विवस्त्र करुन अश्लील कृत्य करायला लावणारे चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 04:34 PM2022-02-10T16:34:04+5:302022-02-10T16:34:10+5:30
शेणही खाऊ घालत असत : अत्याचार सहन केलेल्यांना ही आवाहन
सोलापूर : गावठी पिस्तूल व गुप्तीचा धाक दाखवून लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पथकाने ही कारवाई केली असून, २ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सागर अरुण कांबळे (वय २२ रा. न्यू बुधवार पेठ भीम विजय चौक सोलापूर), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय २६ रा. न्यू बुधवार पेठ आंबेडकर उद्यान समोर, आनंद चौक), सतीश उर्फ बाबूलाल अर्जुन गायकवाड (वय २५ रा. १२६, बुधवार पेठ मिलिंदनगर सोलापूर ), अक्षय प्रकाश थोरात (वय २६ रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ विश्वदीप चौक सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की? काही तरुण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण व लुटमार करीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून दिली पथकाच्या पोलिसांनी रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला होता. चौघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, धारदार गुप्ती, चार मोबाईल, दोन मोटारसायकली आढळून आल्या. मोबाईलमध्ये मिळालेल्या व्हिडिओची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी पिस्तूलचे व धारदार गुप्तीचा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखवणे, त्यांना मारहाण व दमदाटी करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करणे, अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडणे, शेण खाऊ घालने, आदी विक्षिप्त प्रकारचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळून आले. रेकॉर्डिंग करण्यात आलेले व्हिडिओ एकमेकांमध्ये व्हाॅट्सॲपद्वारे प्रसारित केल्याचे दिसून आले.
याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर , सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भलचिम, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, हवालदार आबा थोरात, पोलीस नाईक सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजाप्पा अरेनवरू, थिटे, राजेश घोडके, स्वप्नील कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळू माने, बेळे, नागटिळक, सुहास गायकवाड यांनी पार पाडली.
पीडित लोकांनी पोलिसांना संपर्क साधावा : डॉ. कडूकर
- पकडण्यात आलेल्या चौघांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी अनेक गुन्हे केल्याचे समजते. महिला किंवा पुरुष यांच्या त्रासाला किंवा अत्याचाराला बळी पडले असेल तर त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
- चौघांना शुक्रवारी चार फेब्रुवारी रोजी अटक करण्यात होती. ५ फेब्रुवारी रोजी चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायाधीशांनी १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
एक जण पोलिसाचा भाऊ
- 0 अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोघे ड्रायव्हर आहेत. एकजण मजूर तर दुसरा मंडप व्यावसायिक आहे. एका ड्रायव्हरचा भाऊ ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.
- 0 अक्षय थोरात याच्याविरुद्ध यापूर्वी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अन्य तिघांच्या नावे सध्या तरी गुन्हे दाखल असल्याचे दिसून येत नाही.
- 0 अटक करण्यात आलेल्या चौघांची एक मोठी गॅंग असून यामध्ये १५ ते १६ तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींचा ही शोध घेत आहेत.
- गुन्हा दाखल न करण्यासाठी नेत्यांचा दबाव
- 0 अटक केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी काही राजकीय पुढारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. गुन्हा दाखल करू नका काय आहे ते मिटवून घेऊ अशी ऑफर पोलिसांना देत होते. पोलीस ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना पुढे तुम्हाला कधी तरी अडचण येईल अशी धमकी वजा सूचना देत होते अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.