धक्कादायक; पंढरपुरात बनावट कागदपत्रे, बनावट स्वाक्षरी द्वारे केली १९ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 08:41 AM2022-01-08T08:41:27+5:302022-01-08T08:41:56+5:30
राज्य परिवहन सहकारी बँकेच्या पंढरपूर शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हे दाखल...
पंढरपूर : राज्य परिवहन सहकारी बँक शाखा पंढरपूर येथील तत्कालीन व्यवस्थापक,उप लेखाकार, लिपीक यांच्यासह अन्य दोघांनी बनावट कागदपत्रे करून बनावट स्वाक्षरी करून कर्ज प्रकरण दाखवून १९ लाख १२ हजार ४७ रुपयांची फसवणूक केल्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन सहकारी बँक शाखा पंढरपूर येथील तत्कालीन बँक व्यवस्थापक बुचके (रा. भोसरे, ता. माढा, जि.सोलापुर), तत्कालीन उप लेखाकार व्ही. एस. जाधव (रा. सांगली, जि.सांगली), तत्कालीन लिपीक यु.व्ही.मुचंडे (रा.सोलापुर, जि. सोलापुर), सांगोला आगार सफाई कामगार लक्ष्मण सोनवले (रा. सांगोला), एसटी कामगार सेनेचे सचिव गोरख कळकुंबे (रा.सांगोला) यांनी स्वतःच्या फायद्याकरिता आपापसात संगनमत करून अशोक बालक पवार (वय ५९, रा. न्यु इंग्लिश स्कुलच्या मागे, मिरज रोड, शिवाजी नगर, सांगोला, ता.सांगोला, जि.सोलापूर) यांच्या बनावट हस्ताक्षराचा व बनावट स्वाक्षऱ्या केल्या.
अशोक पवार यांच्या नावे बँकेचे कर्ज प्रकरणाची बनावट कागदपत्रे तयार करून बनावट प्रकरण परस्पर मंजूर केले. २०११ ते २०२१ या कालावधीत पवार यांनी न घेतलेल्या कर्ज रक्कम ९ लाख २० हजार ५२० रुपये तसेच पवार यांच्या पगारामधून २०११ पासून ते मे २०२० अखेर ९ लाख ९१ हजार ५२७ रुपये अशी २०११ ते २०२२ या कालावधीत एकूण १९ लाख १२ हजार ४७ रुपयांची फसवणूक केली आहे. यामुळे वरील पाच जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि कपिल सोनकांबळे करत आहेत.