आता तरी माझ्यावर उपचार करा, कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल घेऊनच तो रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 06:34 PM2020-07-13T18:34:36+5:302020-07-14T16:38:22+5:30
मुंबईतून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाने मरवडेतील डॉक्टरांची उडवली झोप
मंगळवेढा : 'हा बघा रिपोर्ट मी कोरोना पॉझिटिव्ह आहे; आता माझ्यावर उपचार करा ' असे म्हणत मरवडे (ता. मंगळवेढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण चक्क खवे येथून पायी चालत आपल्या मुलासह दाखल झाला. साक्षात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णच समोर उभा पाहून उपस्थित असलेल्या वैद्यकीय सेवा देणाºया कर्मचाºयांबरोबर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची भंबेरी उडाली. दरम्यान चक्क (बेलापूर) मुंबई येथून मंगळवेढा येथे पोहचलाच कसा असा प्रश्न आहे़ या पॉझिटिव्ह रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधण्याची डोकेदुखी वाढली आहे.
कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाºया मरवडे येथे असणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची मोठया प्रमाणात वर्दळ या दवाखान्यात असते. आजही सकाळी ओपीडी सुरू झाल्यानंतर तालुक्यातील खवे गावातील एक रुग्ण (वय ४५) आपल्या मुलासह चालत तेथे दाखल झाला. रुग्ण व मुलाने येथील वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत मी सकाळीच बेलापूर येथून आपल्या मूळगावी खवे (ता. मंगळवेढा) येथे आलो आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, आता माझ्यावर उपचार करा, असे सांगितले. रुग्णाच्या या खळबळजनक विधानानंतर त्या रुग्णाबाबत सविस्तर माहिती विचारली असता आपण बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एका खाजगी लॅबचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तो रुग्ण सकाळीच बेलापूर येथून एक खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जवळा (ता. सांगोला) येथे आला व नंतर खवे येथे आला.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलांसह मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो असल्याचे त्याने सांगितले. रुग्णाची खातरजमा केल्यानंतर त्याला व त्याच्या कुटूंबियास सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुढील कार्यवाहीसाठी मंगळवेढा येथे पाठविण्यात आले.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता संबंधित रुग्णाला मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्याकडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट असल्याचे सांगितले़ बेलापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण आपल्या मूळ गावीच कसा येतो याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री कशी असणार हे शोधणे प्रशासनाला डोकेदुखी आहे़