धक्कादायक; आईच्या मदतीने मुलाने काढला भांडखोर बापाचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:26 PM2020-01-14T17:26:03+5:302020-01-14T17:28:34+5:30
भंडारकवठे खून प्रकरण: संशयितांना निवर्गी येथून घेतले ताब्यात
सोलापूर : रोज दारू पितो, घरात नेहमी भांडण करतो, सतत मारहाण करतो, अशा अनेक कारणाने वैतागलेल्या मुलाने लहान भाऊ, आईच्या मदतीने जन्मदात्या बापाचाच काटा काढला. त्याची हत्या करून भंडारकवठेजवळ भीमा नदीत प्रेत फेकून दिल्याची कबुली संशयित मुलगा आणि मयताच्या पत्नीने पोलिसांसमोर आज दिली.
वळसंग येथील दत्तात्रय सिद्धाराम चौगुले (वय ५०) हे निवर्गी (ता. इंडी) येथे अनिलकुमार तांडेकर यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास होते़ कुटुंबीयांसमवेत शेतातील वस्तीवर राहत होते. गुरुवारी भंडारकवठेनजीक भीमा नदीपात्रात छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील प्रेत पोत्यात बांधून टाकण्यात आले होते़ या प्रकरणाची माहिती मंद्रुप पोलिसांना देण्यात आली़ पोलीस पाटील अशोक मुकाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत नंतर अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृताची ओळख पटत नव्हती़ त्यांच्याकडे कसलाही पुरावा नव्हता़ त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी मयताचा फोटो व्हॉट्सअॅपवरून व्हायरल केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर घटना घडल्याने हा फोटो कर्नाटकात गेला. त्याचा फोटो पाहून अनिलकुमार दांडेकर यांनी मंद्रुप पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्यामुळे मयताची ओळख पटली. मात्र आरोपी सापडत नव्हते.
या प्रकरणी मयताची पत्नी सुनीता (वय ४७), मुलगा अतिष (वय २३) आणि एक अल्पवयीन मुलासह चडचण पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांना मंद्रुप पोलिसांच्या स्वाधीन केले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी पोलिसी खाक्या दाखविताच पत्नीने खुनाची कबुली दिली. नवºयाचा आपल्याला खूप त्रास होता. तो रोजच दारू पिऊन यायचा आणि घरातील सर्वांशी भांडायचा. त्यामुळे वैतागून आम्हीच त्याचा काटा काढला, अशी कबुली पत्नी सुनीताने दिली.
मूळ ठिकाणी येताच पोलिसांचा छापा
घटनेनंतर मयत दत्तात्रय चौगुले यांची पत्नी आणि दोन्ही मुले गायब होती़ त्यांचा मोबाईल बंद होता. मंद्रुप पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. चार दिवस इस्लामपूर, आटपाडी, विटा येथे मुक्काम करून रविवारी रात्री निवर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ चडचण पोलिसांच्या मदतीने मंद्रुपच्या पोलिसांनी अचानक छापा टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले़ अल्पवयीन आरोपीची न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
दुचाकीवरून प्रेत भीमा नदीत आणून टाकले
भांडण झाल्याच्या रात्री मुलगा अतिषने वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात कुºहाडीने घाव घातला. पत्नी सुनीताने छातीवर, कपाळावर विळ्याने वार केले. मृत्यू झाल्यानंतर त्याचे प्रेत पोत्यात घालून लहान भावाच्या मदतीने दुचाकीवर टाकून रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान भीमा नदीपात्रात टाकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली़