धक्कादायक; पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीने पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:18 PM2020-06-11T12:18:23+5:302020-06-11T12:21:02+5:30

सोलापुरातील न्यू बुधवार पेठेतील प्रकार; शासकीय रुग्णालयात दाखल केल्यापासून होते तणावाखाली

Shocking; Husband commits suicide for fear of his wife becoming Corona | धक्कादायक; पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीने पतीची आत्महत्या

धक्कादायक; पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीने पतीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअभिमन्यू भगवान कसबे (वय ७०, रा. राहुल चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव अभिमन्यू कसबे यांची पत्नी शारदाबाई कसबे यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होताताप वाढल्याने नातू शुभम कसबे याने तिला उपचारासाठी मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले

सोलापूर : सध्या कोरोना या संसर्गाने जगभर थैमान घातले असताना याच परिस्थितीत पत्नीला ताप आल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या पत्नीला अ‍ॅडमिट केल्याने तणावात आलेल्या पतीने तिला कोरोना तर झाला नसेल ना, या धास्तीने २४ तासात राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळीे ६.३० वाजता उघडकीस आला.

अभिमन्यू भगवान कसबे (वय ७०, रा. राहुल चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. अभिमन्यू कसबे यांची पत्नी शारदाबाई कसबे यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होता. ताप वाढल्याने नातू शुभम कसबे याने तिला उपचारासाठी मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिमन्यू कसबे यांना मंगळवारी सकाळपासूनच चिंतेने ग्रासले होते. ते सतत नातूला फोन करून चौकशी करीत होते. नातू आजोबाला आजी बरी आहे, असे सांगत होता. मात्र अभिमन्यू यांना विश्वास बसत नव्हता. ते शासकीय रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरत होते. मात्र त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले.

आपल्या पत्नीला बहुतेक कोरोनाची लागण झाली असावी, असा दाट संशय अभिमन्यू कसबे यांना आला. त्यांनी मंगळवारी जेवणाकडेही दुर्लक्ष केले. मंगळवारी रात्री नातू शुभम घरी आला, त्याने आजी बरी असल्याचे सांगितले. मात्र अभिमन्यू यांचे समाधान झाले नाही. पुन्हा एकदा त्यांनी दवाखान्यात जाण्याची इच्छा नातवाकडे व्यक्त केली. मात्र तसे जाता येणार नाही, असे सांगितल्यावर ते आपल्या अंथरुणात गेले. पहाटे ५.३० वाजता ते उठले, घरातील छोटी कामे केली. सून व नातू झोपले होते, त्यांनी घरातील एका खोलीत जाऊन नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास घेतला.

सकाळी ६.३० वाजता घरात झोपलेले नातू व सून उठले. काही वेळानंतर लक्षात आले की, आबा म्हणजे अभिमन्यू हे घरात दिसत नाहीत. सून सुहासिनी कसबे यांनी मुलगा शुभम याला सासरे अभिमन्यू यांना पाहण्यास सांगितले. शुभमने घरातील आतल्या खोलीत जाऊन पाहिले तेव्हा अभिमन्यू कसबे गळफास घेऊन लटकत असलेल्या स्थितीत आढळून आले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यास याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अभिमन्यू कसबे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र ज्या ठिकाणी आपण अ‍ॅडमिट आहोत त्याच ठिकाणी पतीचा मृतदेह आला आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.

सहजीवनाची ४५ ते ५० वर्षे एकत्रित घालविल्यानंतर कोरोनाच्या महामारीत पत्नीला ताप आला. आता तिला कुठे कोरोना होतो की काय? असा संशय अभिमन्यू यांना आला. तिला कोरोना झाला अन् काय बरे-वाईट झाले तर माझ्या जगण्याला काय अर्थ, अशी खंत मनात ठेवून अभिमन्यू कसबे यांनी आत्महत्या केली. ज्या जीवनसाथीसाठी त्यांनी आत्महत्या केली, तीही शासकीय रुग्णालयातच होती. मात्र ज्या ठिकाणी आपण अ‍ॅडमिट आहोत त्याच ठिकाणी पतीचा मृतदेह आला आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.
 

Web Title: Shocking; Husband commits suicide for fear of his wife becoming Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.