धक्कादायक! चार महिन्यात १६ लाचखोर जाळ्यात; पुणे विभागात सोलापूर टॉपवर
By Appasaheb.patil | Published: April 21, 2023 04:17 PM2023-04-21T16:17:07+5:302023-04-21T16:17:15+5:30
शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते.
सोलापूर : कोणतेही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील काम करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारणे हा गुन्हा असतानाही सर्वसामान्यांची लूट सुरूच आहे. जानेवारी ते एप्रिल पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील १६ जणांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात सोलापुरात सर्वाधिक लाचखोर सापडले आहेत.
शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते. सर्वच शासकीय कार्यालयांत लाच दिल्याशिवाय कामे होत नाही. त्यात महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस खात्याचा दुसरा क्रमांक लागतो. मागील वर्षातील आकडा पाहिला असता यंदाच्या वर्षात लाचखोरांची संख्या जास्त आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात आलेले सापळे आणि पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क - ०३, महसूल - ०१, भूमिअभिलेख - ०१, महिला व बालविकास - ०१, महानगरपालिका - ०१, खासगी व्यक्ती - ०२, ग्रामीण पोलिस - ०३ असे लाचखोरांची संख्या आहे. यंदाच्या वर्षात १ जानेवारी ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० सापळे यशस्वी केले. यात १६ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर लाचखोरीत पुणे विभाग टॉपवर आहे.