धक्कादायक; पतीचा खून झाल्याची माहिती; तरीही पत्नीचा हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:22 PM2020-01-24T12:22:55+5:302020-01-24T12:27:23+5:30
अंगद घुगे खून प्रकरण; मुलाच्या मित्रांना सुपारी देऊन पतीचा केला खून, ग्रामसेवक पत्नीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
कुर्डूवाडी : बार्शीचे कृषी सहायक अंगद घुगे यांच्या खुनात संशयित आरोपी म्हणून मुलगा विशाल घुगे याच्यानंतर त्यांची पत्नी ग्रामसेविका जयश्री घुगे हिला बुधवारी सकाळी अटक केली. त्यानंतर तपासाअंती मुलाच्या मित्रांकरवी सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले. गुरुवारी दुपारी माढा न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. सय्यद यांच्या न्यायालयापुढे उभे केले असता तिला २८ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांच्या माहितीनुसार अंगद घुगे यांचा मुलगा विशाल घुगे याच्या अटकेनंतर खुनातील अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यात अंगद घुगे यांच्या पत्नी ग्रामसेवक जयश्री घुगे हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर तिलाही बुधवारी अटक करण्यात आली. पोलीस तपासानंतर गुरुवारी तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी प्रत्यक्ष खुनात विशाल घुगे याचे मित्र अतुल गांधले ( वय २४, रा लऊळ ,सध्या सरकारी गोडाऊनजवळ, बार्शी), प्रसाद गांधले ( वय २२,रा लऊळ,सध्या सरकारी गोडाऊनजवळ, बार्शी) व विकी शिंदे ( वय १९, रा. बार्शी) यांचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या मुलगा विशाल व पत्नी जयश्री वगळता तिन्हीही मित्र आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
१४ जानेवारीपासून कृषी सहायक अंगद घुगे हे घरातून बेपत्ता होते तरीही त्यांच्या पत्नीने किंवा मुलाने कोणत्याही पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे त्या दोघांवर पोलिसांचा संशय होता.
पोलीस तपासात मुलाकडून व पत्नीकडून काही गोष्टी उघड झाल्याने अंगद घुगे यांच्याशी पत्नी व मुलगा यांचे संबंध पराकोटीचे बिघडलेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यातूनच मुलगा व पत्नी यांनी पूर्व नियोजन करून सदरचा खून मित्रांच्या साथीने केला असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच आरोपी सामील असल्याचे सिद्ध झाले आहे. यातील तिघे आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयात आरोपीतर्फे अॅड. हरिश्चंद्र कांबळे तर सरकार पक्षातर्फे अॅड. विशाल सक्री यांनी काम पाहिले.
खून झाल्याची माहिती... तरी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग
- बेपत्ता झालेल्या अंगद घुगेचा मुलगा विशाल व त्याच्या मित्रांनी पूर्व नियोजनाप्रमाणे १४ जानेवारीला खून केल्याची माहिती असतानाही १५ जानेवारीला पत्नी जयश्री घुगे यांनी मूळ भालगाव गावी महिलांबरोबर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दिवसभर सहभाग घेतला होता. तिने नवºयाचा सुपारी देऊन मुलाच्या मदतीने खून केल्याचे तिच्या सासू- सासºयाला व दिराला जाणवू दिले नाही. पण तिच्या दिरांना तिचा संशय आला होता असे तिचे दीर व मृत अंगद घुगेचे भाऊ गुणवंत घुगे यांनी पोलीस जबाबात सांगितले आहे.