धक्कादायक; सिव्हिलच्या  आयसोलेशनमध्ये पेशंट झोपतो चक्क जमिनीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 08:04 PM2020-04-25T20:04:12+5:302020-04-25T20:05:48+5:30

एका रुग्णाने गुपचूप काढले व्हिडिओ : रुग्णालयातील दुरवस्थेचे फोटोही व्हायरल; स्वच्छतागृहाची दुरवस्था...

Shocking; In the isolation of civil, the patient sleeps on the ground! | धक्कादायक; सिव्हिलच्या  आयसोलेशनमध्ये पेशंट झोपतो चक्क जमिनीवर !

धक्कादायक; सिव्हिलच्या  आयसोलेशनमध्ये पेशंट झोपतो चक्क जमिनीवर !

Next
ठळक मुद्देअ‍ॅडमिट केलेल्या एका रुग्णाने वॉर्डातील दुरवस्थेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलशुक्रवारपर्यंत या आयसोलेशन वॉर्डात ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारास दाखल करण्यात आले

राजकुमार सारोळे

सोलापूर: सोलापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्हच्या वाढत चाललेल्या रुग्णांची चिंता भेडसावत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण अ‍ॅडमिट असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डामधील दुरवस्थेचे फोटो व्हायरल झाले आहेत. जमिनीवर गादी टाकून झोपविलेला रुग्ण आणि स्वच्छतागृहाची दुरवस्था पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉक रिकामा करण्यात आला. याठिकाणी आयसोलेशन वाॅर्डाची सोय करण्यात आली. गेल्या १२ दिवसांत या वाॅर्डात रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर रुग्णांसाठी पंखे, कूलर, बेड, टीव्ही व संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किटची व्यवस्था केल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले होते.
शुक्रवारपर्यंत या आयसोलेशन वॉर्डात ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारास दाखल करण्यात आले आहेत.

अ‍ॅडमिट केलेल्या एका रुग्णाने वॉर्डातील दुरवस्थेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यामध्ये आयसोलेशनमधील स्वच्छतागृहाची दुरवस्था स्पष्टपणे दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जमिनीवर बेड टाकून झोपविण्यात आल्याचे दिसत आहे.


आयसोलेशन वॉर्डाची दुरवस्था


कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सर्व आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. पण आयसोलेशन वॉर्डात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितले. शनिवारी सकाळी मी फीवर सेंटरवर गेलो. तेथे अनेक जण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होते. एक मुलगी तर तीन तासा़पासून तळमळत होती, पण या रुग्णांची दखल घेणारे कोणीच उपस्थित दिसत नव्हते. त्यामुळे मी विभागप्रमुख डॉ. प्रसाद यांच्याशी संपर्क साधला. त्यांना फीवर सेंटर व आयसोलेशन वॉर्डातील गैरसोयींची कल्पना दिली. पण त्यांनी वॉर्डात सोयी केल्या आहेत, असे सांगितले. तुम्ही तेथे पीपीई किटशिवाय जाऊ नका, असेही त्यांनी सांगितले.

सात महिन्यांपासून पगार नाही


शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. त्यांना सात महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन ते काम करीत आहेत. त्यांना पुरेशा सुविधा नाहीत व स्वच्छतेचे प्रशिक्षण नाही. ए ब्लॉक अत्यंत जुने असल्याने स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. रुग्णांना पुरेसे बेड नाहीत. बेडशीट, चादरी नाहीत. त्यामुळे फक्त बेडवर त्यांना झोपविले जात आहे. बेडशीट, चादरी निर्जंतुक करण्याचा खर्च कोण करणार म्हणून वेळ मारून नेत असल्याचा आरोप नगरसेवक मिस्त्री यांनी केला. रुग्णाच्या एका नातेवाईकाने जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन सुविधेबाबत खातरजमा करावी, अशी मागणी केली आहे.

कोरोना वॉर्डाची स्वच्छता करा

आयसोलेशनमधील वॉर्डाची दररोज स्वच्छता केली जावी, अशी मागणी रफिक इनामदार यांनी केली. या ठिकाणी आमचा एक रुग्ण दाखल करण्यात आला होता. त्यावेळी वॉर्डातील दुरवस्था पाहायला मिळाली. आम्ही डॉक्टरांच्या प्रत्येक सूचनेचे पालन केले, त्यांचे कामही चांगले आहे. पण स्वच्छतेची यंत्रणा प्रशासनाकडे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Shocking; In the isolation of civil, the patient sleeps on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.