धक्कादायक; गौराईसाठी उघड्या ठेवलेल्या घरातून ‘लक्ष्मी’ गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:19 PM2020-08-28T14:19:02+5:302020-08-28T14:22:09+5:30
सोलापूर शहरात दोन ठिकाणी चोरी : सात लाखांचा ऐवज लंपास
सोलापूर : गुरुनानक चौकातील साई मोटार्स कन्सल्टिंग आॅफिसचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सव्वादोन लाख रुपयांची रोकड चोरली. चोरी करताना चोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात साई मोटार्सचे जहांगीर महेबूब नदाफ (वय ४९, रा. किसन नगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दुसºया एका घटनेत लक्ष्मीसाठी उघड्या ठेवलेल्या घरातून ४ लाख ८५ हजारांची चोरी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरूनानक चौकातील साई मोटार्सचे अज्ञात चोरांनी गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकान फोडले. या चोरट्यांनी पांढºया रंगाच्या दुचाकीवर दुकानासमोरून दोन वेळा चक्कर मारली. त्यानंतर दुकानासमोर दुचाकी लावून दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून सीटीटीव्ही कॅमेºयाचे तोंड दुसरीकडे फिरवले. त्यानंतर दुकानातील कपाटात ठेवलेले दोन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन पसार झाले. ही घटना सकाळी उघडकीस आली. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास सहायक फौजदार घोडके करत आहेत.
जुळे सोलापुरात पाच लाखांची चोरी
घरात महालक्ष्मी असल्यामुळे घराचे मुख्य दार उघडे ठेवून झोपले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत संतोष नामदेव वाघमारे (वय ४५, रा. गोकुळ सोसायटी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घरात महालक्ष्मी असल्यामुळे वाघमारे कुटुंबीय गुरुवारी रात्री घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून हॉलमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत कपाटामधील सोने-चांदी आणि पाच हजार रुपये रोख असे एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरला.