धक्कादायक ; रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:07 AM2018-11-05T10:07:24+5:302018-11-05T10:10:59+5:30
पोलिसांत तक्रार : औषध कंपनीवर दावा ठोकण्याची रुग्णालयाची तयारी
सोलापूर : येथील सोलापूर सहकारी रुग्णालयातील भांडारातून घेतलेल्या इंजेक्शन द्यावयाच्या औषधाच्या बाटलीत (सलाईन) अळ्या आढळून आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, अन्न व औषध प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानेही भांडारातील औषधांची तपासणी केली. दरम्यान, या प्रकरणाची रुग्णालयाने गंभीरतेने दखल घेतली आहे.
पृथ्वीराज दत्तात्रय चव्हाण (वय २ वर्षे, रा़ रविवार पेठ, कबीर मठाजवळ, सोलापूर) या मुलाला तीन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकल्याचा आजार जडल्याने त्याला सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉ़ शिरसी यांचे उपचार सुरू करण्यात आले. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेले दोन इंजेक्शन आणण्यात आले. त्याबरोबर सलाईनही मागवली गेली.
पहिले इंजेक्शन सलाईनद्वारे रूग्णाला देण्यात आले. दुसरे इंजेक्शन दिले जात असताना त्यामध्ये नातेवाईकांना अळ्या दिसून आल्या. अळ्या लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्स व डॉक्टरांकडे चौकशी केली. त्यानंतर नातेवाईकांनी थेट जेलरोड पोलीस ठाणे गाठले. मुलाचा काका शंकरराव चव्हाण (रा. रविवार पेठ) यांनी पोलिसांत तक्रार करून संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलावून सलाईन व इंजेक्शनची तपासणी केली. दोन्हींचे नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली असून, एका पथकाद्वारे सोलापूर सहकारी रूग्णालयाचे औषधी भांडार तपासण्यात आले. तर सोलापूर सहकारी रूग्णालयाच्या प्रशासनाने इंजेक्शन पुरवणाºया कंपनीवर दावा ठोकण्याची तयारी केली आहे.
राज्य आरोग्य मंत्रीही रुग्णालयात
इंजेक्शनमध्ये अळी आढळल्याच्या चर्चेने शहरात जोर धरल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेदेखील रुग्णालयात दाखल झाले.
अहवाल आल्यानंतर होणार गुन्हा दाखल
- सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना पृथ्वीराज चव्हाण या बालकाला लावण्यात आलेल्या सलाईनमध्ये आढळून आलेल्या अळ्यांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती फौजदार दांडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घडलेल्या प्रकाराला औषध कंपनी पूर्णत: जबाबदार आहे़ पहिला डोस देत असताना असे जंतू आढळले नाहीत़ मात्र दुसºया डोसमध्ये जंतू आढळल्यानंतर तो तत्काळ थांबवला़ कंपनीने केलेल्या चुकीवर आज बैठक बोलावली आहे़ त्या कंपनीविरोधात दावा ठोकण्याबाबत चर्चा होणार आहे़
-डॉ़ सुरेश मणुरे
मुख्य वैद्यकीय अधिकारी
सोलापूर सहकारी रुग्णालय