धक्कादायक; सोलापुरातील वकील महिलेने हुंडा मागणीच्या जाचामुळे संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:47 AM2020-07-03T10:47:47+5:302020-07-03T10:49:29+5:30
सोलापुरातील घटना; प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर : सासरच्या त्रासाला कंटाळून वकील असलेल्या महिलेने राहत्या घरी अवघ्या एक वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून गळफास घेतला. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि.३० जून रोजी रात्री १०.३० ते ११.४३ दरम्यान घडला.
धनंजय शिवाजी पवार, सासू-शैलजा शिवाजी पवार,नणंद- सविता शिवाजी पवार, नणंद-दीपाली शिवाजी पवार (सर्व रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्मिता धनंजय पवार (वय ३१, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी आई सीतादेवी विठ्ठल गोवे (वय ५0, रा. उजनी वसाहत पाठीमागे संभाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
स्मिता यांचे माहेर मंगळवेढा असून त्यांचे लग्न दि.६ मे २०१८ रोजी सोलापुरातील प्रा. धनंजय शिवाजी पवार यांच्या सोबत झाले होते. लग्नानंतर बारीक सारीक गोष्टीवरून पतीसह सासरच्या लोकांनी स्मिता यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अॅड. स्मिता पवार यांच्या आई-वडिलांनी सासरी जाऊन जावई व सासू-सासºयांना समजावून सांगितले होते. पुन्हा त्रास सुरू झाला. अॅड. स्मिता पवार यांना उपाशी ठेवण्यात येऊ लागले. तुझ्या आई-वडिलांनी लग्नात सोने व पैसे कमी दिले असे म्हणत भांडू लागले. त्यानंतर त्यांना माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावला. अॅड. स्मिता पवार यांनी त्यांच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ५० हजार रुपयांची पूर्तता केली. पैसे देताना वडील विठ्ठल गोवे यांनी माझ्या मुलीला त्रास देऊ नका अशी विनंती केली. त्यानंतर अॅड. स्मिता पवार यांना त्रास हा कायम सुरूच राहिला. अॅड. स्मिता पवार यांना मुलगी झाली. सासरी गेल्यानंतर स्मिता यांना पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली.
काम करू दिले जात नव्हते
अॅड. स्मिता पवार यांनी लॉचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टीससाठी जाण्याचा प्रयत्न करीत होत्या; मात्र पती व सासरच्या लोकांनी त्यांना न्यायालयात काम करण्यास नकार दिला. वकिलाची नोकरी करायची नाही असे बजावले होते.
आत्महत्या करण्यापूर्वी अॅड. स्मिता पवार यांनी दि.३० जून रोजी रात्री १०.३० वाजता आई-वडिलांना फोन केला होता. रडत रडत त्यांनी होणाºया त्रासाची माहिती आई-वडिलांना दिली होती; मात्र काही वेळेनंतर जावई धनंजय पवार याने सासरे विठ्ठल गोवे यांना फोन केला व स्मिता मुलगी सानवी हिला घेऊन बेडरुममध्ये गेली आहे. आतमध्ये सानवी रडत आहे, अन् स्मिता दरवाजा उघडत नाही असे सांगितले. त्यानंतर मुलगी जास्तच रडत असल्याचा आवाज येत असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अॅड. स्मिता पवार यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.