धक्कादायक; सांगोला-मिरज रोडवर कार उलटल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 06:06 PM2022-03-07T18:06:05+5:302022-03-07T18:06:08+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले
सांगोला : भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून शासकीय वैद्यकीय अधिकारी ठार झाला, तर चालक मात्र सुदैवाने बचावला. हा अपघातसांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडी (ता. कवठेमंहकाळ) येथे घडला. डॉ. अरुण मोराळे (वय ६६, रा. बार्शी, सध्या मनिषानगर, कोल्हापूर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असे तिघेही डॉक्टर आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे.
मुळचे बार्शी येथील डॉक्टर अरुण मोराळे हे महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आठ जिल्ह्यांचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. ते कोल्हापूर येथून शुक्रवारी सकाळी एमएच ०९ /डीएक्स ४६४४ या कारमधून मीटिंगसाठी लातूरला निघाले होते. त्यांची वेगाने जाणारी कार सांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडीजवळ रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोनदा उलटली. अपघातात त्यांची कार सुमारे ४०० फुटांच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिली.
कारच्या मागच्या बाजूला बसलेल्या डॉक्टर मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले, तर चालक सोहेल सलीम शेख (१९, रा. कोल्हापूर) याला किरकोळ दुखापत झाली आहे.