धक्कादायक; अकलूजच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील हॉस्पीटलमधील मेडिकल दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 03:02 PM2020-06-16T15:02:08+5:302020-06-16T15:05:36+5:30
अकलूज ग्रामस्थांचा पोलिस यंत्रणेवर अविश्वास; ग्रामस्थांनी केली जिल्हाधिकाºयांकडे तक्रार
अकलूज : अकलूज येथे दुस-यांदा प्रतिबंधात्मक क्षेत्रात विलगीकरण झालेल्यांचे दुकानफोडी झाल्याने अकलूज परिसरात खळबळ उडाली असून बंदिस्त क्षेत्रातील घरांची घडफोडी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान पहिली घरफोडीतील तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन स्थानिक तपास यंत्रणेवर अविश्वास दर्शवित उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी केली आहे.
संग्रामनगर येथील पहिली घरफोडी अजून ताजी असतानाच अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये माढा तालुक्यातील एक महिला उपचारासाठी आली होती, ती पुढील उपचारासाठी सोलापुरात दाखल झाली़ दरम्यान, कोरोनाने तिचा मृत्यू झाल्याने अकलूज येथील त्या हॉस्पिटलचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून बंदिस्त करण्यात आला होता़ बंदिस्त काळातच त्या हॉस्पिटलमधील औषधी दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील १४ हजार रुपयांची नाणी व ४ हजार रुपयाच्या नोटा असे एकूण १८ हजार रुपये लुटुन नेल्याची नोंद अकलूज पोलिस ठाण्यात दिली आहे़ दोन ठिकाणी कोरोनामुळे बंदिस्त असलेल्या क्षेत्रात चो-या झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रामनगर-अकलूज येथील व्यापा-याची पत्नी व मुलगा सोलापूर येथे आजारी असलेल्या आईला पाहण्यासाठी गेले होते. त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने २७ मे रोजी सर्व कुटुंबालाच वेळापूर येथे विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवण्यात आले होते. त्यानंतर सर्व कुटुंब ८ जूनला विलगीकरणातुन मुक्त होवुन घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे दिसले. या घरफोडीत त्यांचे १ लाख २५ हजार रोख रक्कम व ३५ तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी सुटले होते. त्याची फिर्याद त्यावेळी दिली होती. त्याचा अद्याप तपास लागला नाही म्हणून तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांना उच्चस्तरीय तपास करण्याच्या मागणीचे निवेदन देताना स्थानिक यंत्रणेवर शंका व्यक्त करीत अविश्वास दाखविला़ अकलूज जैन समाजाच्यावतीनेही जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष प्रद्युम्न गांधी यांनी निवेदन दिले असून व्यक्तिशा जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.