धक्कादायक; मैदानावर माॅर्निंग, इव्हनिंगला वॉक; रात्रीच्या वेळी दारु अड्ड्यांचा शॉक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 05:04 PM2022-07-21T17:04:12+5:302022-07-21T17:04:24+5:30
सोलापुरातील क्रीडा संकुलातील चित्र : मैदानाचा वापर शौचालयासाठी
संताजी शिंदे
सोलापूर : खेळ अन व्यायाम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल, सध्या रात्रीच्या वेळी दारूड्यांचा अड्डा होऊन बसला आहे. दारूच्या बाटल्या, काचेचा खड अन फोडण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे मैदानाची दुरावस्था निर्माण झाली आहे. संकुलाचे कामकाज पाहण्यासाठी असलेल्या समितीचे दुर्लक्ष असून, अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
मैदानात साधा प्रवेश करायचा असेल तर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची गरज आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत मैदानावर ज्येष्ठ नागरिक, पोलीस भरती सराव करणारे तसेच मैदानी खेळाचा सराव करणाऱ्यांना परवानगी आहे. परिसरात प्लॅस्टिक पिशवी, बाटली याचा वापर करण्यास व टाकण्यास बंदी आहे. धुम्रपान, मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. असे नियम कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत, मात्र आतमध्ये याच्या उलट परस्थिती दिसून येते.
अधिकाऱ्याच्या कार्यालयाशेजारीच असलेली संरक्षक भिंत वरून फोडण्यात आली आहे. तेथून अनेकजण चढून आतमध्ये प्रवेश करतात. स्टेडीयमवर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे, मात्र तो तोडण्यात आला आहे. रात्री अपरात्री दारूच्या पार्ट्या करतात. पोस्ट ऑफीसच्या समोरील मैदानाची संरक्षक भिंत फोडण्यात आली आहे. तेथून दिवसा व रात्री तरूण, दारूडे आतमध्ये प्रवेश करतात. शेजारीच पत्र्याचे शेड मारण्यात आले असून पावसात बसण्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी स्थानिक लोक मैदानात उघड्यावर शौचालयाला बसत असतात. या प्रकरामुळे मैदानावर येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संरक्षक भिंतीला जोडून बांधली घरे
० संरक्षक भिंतीला जोडून स्थानिक नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत, मैदानावर पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींकडे संकुलासाठी नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे मैदानावर जावे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.