धक्कादायक; वॉचमनच्या मुलाकडून सोलापुरात विवाहित महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:26 PM2020-07-02T13:26:24+5:302020-07-02T13:28:42+5:30
होटगी रोडवरील मोहिते नगरातील घटना; सीसीटिव्ही कॅमेºयाच्या आधारे आरोपीला पकडण्यात पोलिसांना आले यश
सोलापूर : होटगी रोडवरील मोहिते नगरात गंगाधर निवास या बंगल्यामध्ये राहण्यास असलेल्या महिलेचा खून करून तिचा मोबाईल घेऊन गेल्याप्रकरणी वॉचमनच्या मुलाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार २७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.
सैफअली अश्रफ शेख (रा. कैकशा अपार्टमेंट, मोहिते नगरजवळ, होटगी रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागमणी गुरुपादय्या स्वामी (वय ४५) या गंगाधर निवास या बंगल्यामध्ये एकट्या राहत होत्या. दिनांक २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता नागमणी स्वामी यांचे भाऊ विजयकुमार गुरुपादय्या स्वामी (वय ४९, रा. विल्डवेज, बरनेर महालुंगी रोड, पुणे) यांनी त्यांना मोबाईलवरून फोन केला असता तो स्वीच आॅफ लागत होता. मोबाईल स्वीच आॅफ दाखवत असल्याने त्यांनी बंगल्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज स्वत:च्या मोबाईलवरून पाहण्याचा प्रयत्न केला मात्र तेही बंद दाखवत होते.
विजयकुमार स्वामी यांनी सोलापुरातील त्यांच्या मोठ्या बहिणीला फोन करून सांगितले की, नागमणी हिचा मोबाईल बंद लागत आहे. कोणालातरी बंगल्यावर पाठव आणि पाहावयास लाव, त्यामुळे मोठ्या बहिणीने आपल्या मुलाला गंगाधर निवास बंगला येथे पाठवले. ३० जून रोजी सकाळी साडेसात वाजता मुलगा बंगल्यात गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. बेडरुमचा दरवाजा अर्धवट उघडा होता, आतमध्ये नागमणी स्वामी या जमिनीवर पडल्या होत्या आणि दुर्गंधी पसरली होती. हा सर्व प्रकार बहिणीच्या मुलाने फिर्यादी विजयकुमार स्वामी यांना फोनवरून सांगितला. विजयकुमार स्वामी हे पुणे येथून सोलापुरात आले व त्यांनी बहीण नागमणी स्वामी यांचा अंत्यसंस्कार केला. त्यानंतर त्यांनी घरात सर्वत्र पाहणी केली असता नागमणी स्वामी यांचा मोबाईल कोठेही मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी बंगल्याला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासून पाहिले असता त्यामध्ये दिनांक २७ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एक इसम बंगल्यात लपत-छपत आल्याचे चित्रीकरण आढळून आले.
सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजमध्ये आढळून आलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता तो पाठीमागे असलेल्या कैकशा अपार्टमेंटमधील वॉचमनचा मुलगा असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी विजयकुमार स्वामी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
तरुणाने बंगल्यात केलेला प्रवेश सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
२७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास एक व्यक्ती लपत छपत बंगल्याच्या वॉल कंपौंडवरून आतमध्ये गेली. त्याने घराच्या पाठीमागील दरवाजा वाजवला; मात्र नागमणी स्वामी यांनी दार उघडले नाही. त्यामुळे ती व्यक्ती काही वेळ बंगल्याच्या पाठीमागील भागात घुटमळली. त्यानंतर ती समोरच्या दाराकडे आली. समोरच्या मुख्य दारातून ती बंगल्याच्या आतमध्ये गेली.
सैफअली शेख हा नागमणी स्वामी यांच्या ओळखीचा होता, तो सेंट्रिंगवर कामाला होता. बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या कैकशा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करणाºया व्यक्तीचा मुलगा असून तो तिथेच राहत होता. कामानिमित्त तो नागमणी स्वामी यांच्याकडे येत-जात होता. त्याने खून कशासाठी केला याचा शोध सुरू आहे.
हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे.