धक्कादायक; बेपत्ता महिला बॉन्ड रायटरचा खून; कलेक्टर कचेरीत आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 01:26 PM2022-06-28T13:26:13+5:302022-06-28T13:26:19+5:30
दोन दिवसांपासून नव्हता संपर्क: सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा
सोलापूर : बेपत्ता झालेल्या महिला बॉन्ड रायटरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पडक्या खोलीमध्ये खून झाला. प्रथमदर्शनी महिलेच्या अंगावर जखमा असल्याचे आढळून आल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजिया सलीम शेख (वय ७२, रा.नवीन विडी घरकूल, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रजिया शेख या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉन्ड रायटर म्हणून काम करतात. दि.२५ जून रोजी शनिवार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बंद होते. मात्र परिसरातील दर्ग्याला जाते, असे सांगून त्या घरातून निघून गेल्या. दर्ग्यात दर्शन घेऊन त्या स्वत: जिथे बॉन्ड रायटरचे काम करत होत्या त्या ठिकाणी गेल्या. मात्र त्यानंतर रजिया शेख अचानक गायब झाल्या. शनिवार व रविवार दोन दिवस त्या कोठे गेल्या हे समजले नाही. नातेवाईकांनी फोन केला असता तो स्विच ऑफ लागत होता.
सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिक येण्यास सुरूवात झाली. पडक्या इमारतीच्या परिसरातून दुर्गधी येत होती. एका कार्यालयातील शिपाई आत गेला असता त्यांना रजिया शेख यांचे मृतदेह आढळून आला. शिपायाने पोलिसांना याची माहिती दिली. सदर बझार पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. रजिया शेख यांच्या मुलीला फोन करून माहिती देण्यात आली, नातेवाईकही घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली भेट
- ० संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पाेलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, दुय्यम पोलीस निरिक्षक पोपटराव धायतोंडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
- ० रजिया शेख यांच्याजवळ मोबाईल होता, तो गेल्या दोन दिवसांपासून बंद असून तो मृतदेहाजवळ आढळून आला नाही.
- ० श्वान घटनास्थळापासून दर्ग्यापर्यंत गेले, तेथून पुन्हा ते पडक्या इमारतीमधील खून झालेल्या ठिकाणी आले. दोन वेळा श्वानाने फेऱ्या मारल्या, तेथून ते पुढे जाऊ शकले नाही.
रजिया शेख यांना दोन मुली
० रजिया शेख यांना दोन मुली आहेत, त्या विवाहित असून विडी घरकूल परिसरातच राहतात. रजिया शेख या घरात एकट्याच रहात असून त्या बॉन्ड रायटरचे काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करीत होत्या. आईच्या मृत्यूबाबत समजताच त्या धावत आल्या होत्या, ओक्साबोक्सी रडू लागल्या.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात महिलेचा खून झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. खून कोणी केला? का केला? याचा तपास सुरू आहे. लवकरच सर्व गोष्टी बाहेर येतील.
माधव रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त.