धक्कादायक ! रेशन कार्ड न दिल्याने मुलाकडूनच आई-वडिलांचा खून; गूढ उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:30 PM2024-03-04T13:30:49+5:302024-03-04T13:32:22+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती.
सोलापूर/सांगोला : अतिशय किरकोळ कारणावरुन पोटच्या मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पाचेगाव बुद्रुक (ता. सांगोला) येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला. रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आई- वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती. तो आई-वडिलांकडे मागील ८ ते १० दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता. परंतु ते त्यास देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता. दरम्यान, २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती. हीच संधी साधून समाधानने वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशीलाकडे रेशन कार्ड मागितले. तिने सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोध घेऊ लागला. त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्याने त्याने आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक गु शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक भीमराव खंणदाळे, सहायक पोलिस निरीक्षक शशीकांत शेळके, खाजा मुजावर, नारायण गोलेकर, अक्षय दळवी, गणेश कुलकर्णी केली.
मोठमोठ्याने ओरडले.. डिजेमुळे आवाजच गेला नाही
खिडकीला बांधून पाय ओढल्याने आईचा मृत्यू झाला. हा प्रकार सुरू असताना आई-वडील मोठमोठ्याने ओरडत होते. परंतु, डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज बाहेर गेला नाही. दरम्यान, वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारले. ठार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपाय धुऊन मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली.