धक्कादायक; नगरसेवक कामाठीच्या घरातील डायरीमध्ये हप्ता दिलेल्यांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 12:45 PM2020-09-04T12:45:45+5:302020-09-04T12:51:46+5:30
मटका प्रकरण : प्रतिमहिना लाखो रुपयांच्या वाटपाचा हिशोब
सोलापूर : मटका बुकींवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठीच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये हिशोबाची वहीदेखील आढळून आली आहे. या वहीमध्ये महिन्यात कोणाला किती वाटप झाले याची नोंद असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
न्यू पाच्छापेठ कोंचीकोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये मटका बुकी असल्याचे समजल्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने २४ आॅगस्ट रोजी दुपारी धाड टाकली होती. धाडीमध्ये पोलीस कर्मचारी स्टिफन स्वामी याच्यासह २२ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, यातील मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी मात्र फरार होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरसेवक सुनील कामाठीच्या घराची झडती घेतली तेव्हा मटक्यासंबंधित कागदपत्रे, हिशोबाच्या नोंदवह्या, रोख रक्कम आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. कागदपत्रे व नोंदवही याची पाहणी केली असता त्यामध्ये जेलरोड पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चालणाºया १७ लाइन सापडल्या होत्या. प्रत्येक लाइनमध्ये १२ प्रमाणे सुमारे २०० मटकावाल्यांची नावे निष्पन्न झाली होती. तपासामध्ये आणखी ८८ जणांची नावे पुढे आली आहेत.
सुनील कामाठी यांच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये इतर नोंदवह्याबरोबर एक हिशोबाची वही आढळून आली आहे. हिशोब वहीमध्ये जेलरोड पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिमहिना कोणाला किती पैशाचे वाटप केले जात होते, याची नोंद असल्याचे समजते. बीट मार्शलपासून अधिकाºयांपर्यंत १६० लोकांच्या नावांची यादी असल्याचे समजते. प्रत्येक महिन्याला ५० ते ६० लाख रुपयांचे वाटप केल्याच्या नोंदी हिशोबाच्या वहीमध्ये आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सध्या ही वही गुन्हे शाखेकडे असल्याने त्याचा तपास केला जात आहे.
लिस्टची माहिती घेतली जाईल : पोलीस आयुक्त
नगरसेवक सुनील कामाठी यांच्या घराची झडती घेऊन जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये मटका बुकी व त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, यामध्ये आणखी कोणाची लिस्ट किंवा नावे असतील तर त्याची माहिती घेतली जाईल, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले.
सामाजिक संघटनांच्याही नावांची यादी
हिशोबाच्या वहीमध्ये शहरातील काही सामाजिक संघटनांच्या नावांची ही यादी आढळून आली आहे. कोणत्या सामाजिक संघटनेला सामाजिक उपक्रमासाठी किती पैसे दिले. जयंती उत्सवाच्या काळामध्ये कोणत्या मंडळाला किती वर्गणी दिली, या सर्व बाबींची माहिती हिशोब वहीमध्ये असल्याचे समजते.
प्रत्येक रुपयाचा ठेवला जातो हिशोब
मटका व्यवसायात काम करणाºया कर्मचाºयाने दिवसभरात कोणाला चहापाणी केले, जेवणाची व्यवस्था, पेट्रोलचा खर्च या सर्व बारीकसारीक गोष्टींचा हिशोबही नोंदवहीमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.