धक्कादायक; केवळ रस्ता, मार्केटमध्ये नव्हे, दारात उभ्या केलेल्या बाइक्स असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 05:14 PM2022-03-03T17:14:25+5:302022-03-03T17:14:34+5:30

चोऱ्यांचे धाडस वाढले : वर्षभरात सुमारे १५० पेक्षा जास्त तक्रारी दाखल

Shocking; Only the road, not the market, bikes parked at the door unsafe | धक्कादायक; केवळ रस्ता, मार्केटमध्ये नव्हे, दारात उभ्या केलेल्या बाइक्स असुरक्षित

धक्कादायक; केवळ रस्ता, मार्केटमध्ये नव्हे, दारात उभ्या केलेल्या बाइक्स असुरक्षित

Next

सोलापूर : दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत चालले असून बाजारातच नव्हे तर दारात लावली तरी चोरीला जात आहे. चोरट्यांचे धाडस वाढले असून, दररोज विविध पोलीस ठाण्यांत मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. वर्षभरात सुमारे १५० पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शहरातील बाजारपेठा, सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, दुकाने आदी ठिकाणी मोटारसायकल चोरीला जात होते. आता याच मोटारसायकली स्वतःच्याच दारात किंवा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सुरक्षित ठिकाणी लावली तरी चोरीला जात आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. मोटारसायकल चोरीप्रकरणी बरेच गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, अनेक गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.

हॅण्डल लॉक किती सुरक्षित?

लावलेली मोटारसायकल ही हॅण्डल लॉक केलेली असते. मात्र, चोरटे एका झटक्यात हॅण्डल लॉक तोडतात. मोटारसायकल घेऊन काही क्षणातच पळून जातात. त्यामुळे हॅण्डल लॉक असले तरी मोटारसायकली सुरक्षित नाहीत असे दिसून येत आहे.

चैनीसाठी केली जाते चोरी

आजवर मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहे. मोटरसायकल चोरणारे बहुतांश चोरटे हे तरुण आहेत. चोरलेली मोटारसायकल अवघ्या १५ ते २० हजार रुपयांना विकून त्यातून येणाऱ्या पैशातून चैन केल्याचे समोर आले आहे. शहरात ठेवलेली मोटारसायकल ग्रामीण भागात विकायची. ग्रामीण भागात चोरलेली मोटारसायकल शहरांमध्ये आणून विकायची. बऱ्याच मोटारसायकली जिल्ह्याबाहेर विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. केवळ चैन करणे, मौजमजा करणे यासाठीही काही जण मोटारसायकल चोरी करीत असल्याचे पुढे आले आहे.

मास्टर चावी लावली की गाडी सुरू

मोटारसायकल चालू करण्यासाठी चोरट्यांकडून एक मास्टर चावी असते. गाडी जुनी असो किंवा नवीन चावी फिरवली आणि किक मारली की ती चालू होते. मोटारसायकल कोणत्याही कंपनीची असली तरी मास्टर चावीने ती चालू करता येते. एका मास्टर चावीवर अनेक गाड्या चोरल्याचे विविध प्रकार पुढे आले आहेत.

मोटारसायकल चोरी होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

मोटारसायकल चोरी होऊ नये म्हणून संबंधित मालकाने हँडल लॉक तर केलेच पाहिजे. मात्र, त्याचबरोबर पुढील किंवा मागील चाकाला आणखी एक लॉक लावले पाहिजे. दारात गाडी लावताना त्याला साखळी लावल्यास आणखी सुरक्षितता बाळगता येईल. मोटारसायकल लक्षात येईल, अशा ठिकाणी लावले पाहिजे. घराबाहेर बाजार किंवा अन्य ठिकाणी मोटारसायकल लावताना आजूबाजूच्या लोकांना कल्पना दिली पाहिजे.

Web Title: Shocking; Only the road, not the market, bikes parked at the door unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.