धक्कादायक; नर्मदा, सिद्धार्थ हाॅस्पिटलमधील रुग्ण २४ तासांत इतरत्र हलविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 05:32 PM2021-08-18T17:32:18+5:302021-08-18T17:33:41+5:30
सोलापूर महापालिकेची नाेटीस : अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास केली कुचराई
साेलापूर : अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास विलंब केल्याप्रकरणी नर्मदा मल्टिस्पेशालिटी आणि सम्राट चाैकातील सिद्धार्थ हाॅस्पिटलचे नाेंदणी प्रमाणपत्र बुधवारी सायंकाळनंतर निलंबित करण्यात येत आहे. येथील रुग्ण २४ तासांत इतरत्र हलविण्यात यावेत, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नाेटीस मनपाच्या आराेग्य अधिकारी डाॅ. अरुंधती हराळकर यांनी मंगळवारी दिली.
राज्यात गेल्या दीड वर्षात काही रुग्णालयात आग लागून अनेक जणांचा बळी गेला. राज्य सरकारने रुग्णालयांमध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी शहरातील रुग्णालयांची बैठक घेऊन अद्ययावत यंत्रणा उभारणीचे आदेश मे महिन्यात दिले हाेते. काही रुग्णालयांनी कार्यवाही सुरू न केल्याने १२ मे आणि ४ जून राेजी नाेटीस देण्यात आली. तरीही शहरातील १२ रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ६ ऑगस्ट राेजी ४८ तासांची मुदत दिली हाेती. ही मुदत संपली तरी नर्मदा आणि सिद्धार्थ हाॅस्पिटलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणीस सुरुवात झाली नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून रुग्ण, कर्मचारी, नागरिक यांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. मनपा महाराष्ट्र शुश्रूषागृहे अधिनियमन १९४९ अंतर्गत प्रमाणपत्र २४ तासांत रद्द करीत आहे. आपल्याकडील आंतररुग्णांची इतरत्र साेय करण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास हाॅस्पिटल व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशाराही डाॅ. हराळकर यांनी दिला आहे.
ही रुग्णालयेही रडारवर
शहरातील सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी, कृष्णा, फिनिक्स, निर्मल, लाेकमंगल जीवक, विनीत, साेलापूर पाइल्स केअर, श्री बालाजी, नान्नजकर या रुग्णालयांनी आठ दिवसांपासून अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणीस प्रारंभ केल्याचा दावा केला आहे. काम पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काम पूर्ण न झाल्यास या रुग्णालयांवरही गुन्हा दाखल हाेणार आहे.