धक्कादायक; भंगार रुग्णवाहिकांच्या भरवशावरच रुग्णांना पोहोचावे लागते हॉस्पिटलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:31 AM2021-03-09T10:31:44+5:302021-03-09T10:31:52+5:30

रुग्णवाहिकांचे आयुष्य संपले तरीही धावतात रस्त्यावर : दुरुस्तीवर होतोय बक्कळ खर्च

Shocking; Patients have to be rushed to the hospital with the help of scrap ambulances | धक्कादायक; भंगार रुग्णवाहिकांच्या भरवशावरच रुग्णांना पोहोचावे लागते हॉस्पिटलमध्ये

धक्कादायक; भंगार रुग्णवाहिकांच्या भरवशावरच रुग्णांना पोहोचावे लागते हॉस्पिटलमध्ये

Next

सोलापूर: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे असलेल्या निम्म्या रुग्णवाहिकेचे आयुष्य संपले आहे. तरीही दुरुस्ती करून अशा भंगार रुग्णवाहिकेच्या भरवशावर गरोदर माता, बालक, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी उरकली जात असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागातील ३५ लाख लोकांच्या आरोग्याची काळजी वाहिली जाते. यासाठी ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळपास ४०० उपकेंद्र कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा आरोग्य विभाग यासाठी ८० रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. २००५ मध्ये खरेदी केलेल्या सुमारे ३५ ॲम्बुलन्सचे आयुष्य संपले आहे. तरीही दुरुस्ती करून या ॲम्बुलन्स रुग्णसेवेसाठी पळविल्या जात आहेत. प्रामुख्याने गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आणणे व नेणे, आजारी बालकांना सेवा देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा सरकारी रुग्णालयाकडे रुग्ण नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. ग्रामीण भागात सर्पदंश, अपघात, आग अशा घटनेतील बाधितांनाही ऐनवेळी जिल्हा रुग्णालयाकडे तातडीने नेले जाते. त्याचबरोबर गेले वर्षभर कोरोना महामारीच्या काळात पॉझिटिव्ह रुग्णांची वाहतूक रुग्णवाहिकांना करावी लागत आहे.

निम्म्या रुग्णवाहिका भंगार झालेल्या असतानाही दुरुस्ती करून त्या वापरात आणल्या जात आहेत. दुरुस्तीवर मोठा खर्च होत असतानाही नवीन रुग्णवाहिकेचा प्रस्ताव मंजूर नसल्याने चालढकल केली जात आहे. भंगार रुग्णवाहिकांमुळे रुग्णाच्या जीवावर बेतण्याची भीती चालकांनी व्यक्त केली आहे.

८० रुग्णवाहिका आहेत सेवेत

जिल्हा आरोग्य विभागाकडे ८० रुग्णवाहिका सेवेत आहेत. यातील ११ रुग्णवाहिका तर अखेरच्या घटका मोजत आहेत. चार महिन्यांपूर्वी स्थायी समितीने नवीन रुग्णवाहिका खरेदीला मंजुरी दिली आहे, पण यासाठी वित्त आयोगातील निधी वापरण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक कोरोना महामारीच्या निधीत ही खरेदी होऊ शकली असती. महापालिका व इतर जिल्ह्याने नव्या रुग्णवाहिका घेतल्या आहेत.

४६ हजार रुग्णांची सेवा

गेल्या वर्षभरात ४८ हजार ४८६ गरोदर मातांना या रुग्णवाहिकांनी सेवा दिली आहे. यातील ४६ हजार ९१ मातांना रुग्णालयात ने-आण केली आहे. त्याचबरोबर विविध तपासणीसाठी १० हजार ४६० महिलांना दवाखान्यापर्यंत नेले आहे. एक वर्षावरील ९०१ मुलांना ॲडमिट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडे नेले आहे. १ हजार ४३ जणांना घरातून दवाखान्यात नेले आहे तर ६७२ जणांना दवाखान्यातून घरी नेऊन सोडले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाचे औषधालय सिव्हिल हॉस्पिटल येथे आहे. येथून औषधी व इतर रुग्णसाहित्य नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचाच वापर होतो. करमाळा, माळशिरस, सांगोला, माढा तालुक्यांतील रुग्णवाहिकांना मोठे अंतर कापावे लागते. त्यामुळे या रुग्णवाहिका १५ वर्षांत साडेतीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावल्या आहेत. यामुळे या रुग्णवाहिकांचे मेन्टनन्स वाढले आहे.

रुग्णवाहिकांना नाही विमा

जिल्हा आरोग्य विभागाच्या ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिका १० ते १५ वर्षांच्या आहेत. ३५ रुग्णवाहिकांचे पंधरा वर्षांचे आयुष्यही संपले आहे. त्यामुळे या वाहनांना विमा नाही. सुदैवाने आतापर्यंत या रुग्णवाहिकांचा अपघात झालेला नाही. सरकारी गाड्यांना विमा नसतो. रुग्णकल्याण समितीच्या निधीतून भरपाई देण्याची तरतूद आहे. पण वाहनांचे नुकसान झाल्यास त्याची तरतूद करण्यास फायली फिरत राहतात.

नव्या गाड्यांची गरज...

एका रुग्णवाहिका चालकास गाडीची स्थिती विचारल्यावर नव्या अत्याधुनिक गाड्या घेणे गरजेचे असल्याचे त्यांने सांगितले. गाडीचे आयुष्य संपल्याने वारंवार काम काढते. त्यामुळे दुरुस्तीसाठी गाडी थांबते. त्यावेळी दुसऱ्या आरोग्य केंद्राची मदत घ्यावी लागते. दुरुस्तीसाठी फायली घेऊन कार्यालयास हेलपाटे मारावे लागतात.

जीवांशी होतोय खेळ

दुसरा चालक म्हणाला, रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवेसाठी आहे. गरोदर मातांना त्रास सुरू झाल्यावर वेळेत रुग्णालयात नेणे आवश्यक असते. अशावेळी गाडी लवकर सुरू झाली नाही, तर लोक ओरडतात. विनाकारण आमच्याबद्दल तक्रारी केल्या जातात, त्यामुळे मनस्ताप होतो. त्याऐवजी नवीन गाड्या घेतल्या तर लोकांची सोय होईल.

आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या काही रुग्णवाहिका बऱ्याच कालावधीच्या आहेत. याबाबत आरोग्य समितीत चर्चा झाली आहे. नवीन रुग्णवाहिका घेण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. नादुरुस्त गाड्यांबाबत फेरआढावा घेतला जाईल. लोकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

Web Title: Shocking; Patients have to be rushed to the hospital with the help of scrap ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.