धक्कादायक; व्यक्तिगत वाहने रस्त्यावर आली;अपघाताच्या संख्येत वाढ झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 07:55 PM2022-02-27T19:55:27+5:302022-02-27T19:55:33+5:30
खासगी वाहनांचा अपघात सर्वाधिक; दुचाकीस्वारांचा जीवही जातोय
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एसटी बंद अन् रेल्वेला पडत असलेल्या गर्दीमुळे कन्फर्म तिकीट मिळेनासे झाल्याने लोकांनी खासगी वाहनांच्या वापरावर भर दिला आहे. याशिवाय व्यक्तिगत वापराची खासगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. नववर्षातील जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या अपघातात सर्वाधिक अपघात हे चारचाकी वाहनांचे झाले असून एकाच अपघातात संपूर्ण परिवाराला गमाविलेले अनेक जण आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात व अन्य प्रमुख शहरांकडे जाणारे मार्ग सिमेंट रस्त्याचे झालेले आहेत. चांगल्या रस्त्यामुळे रस्त्यावर धावणार्या वाहनांचा वेग वाढला आहे. या वाढत्या वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आहे. कोरोनाकाळात घरात बसून राहिलेले लोक आता पर्यटन व इतर कामांसाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यातच एसटी व रेल्वेचे कन्फम तिकीट मिळत नसल्याने अनेक जण खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. खासगी वाहने रस्त्यावर वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------
नववर्षात झालेले अपघात
- महिना - मोठा अपघात - गंभीर अपघात
- जानेवारी २०२२ - ५२ - ६० - ३०-५४
- फेब्रुवारी २०२२ - ३४-३७, २३-३५
--------
किरकोळ अपघातात ३६ जण जखमी
जिल्ह्याच्या विविध भागात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात कार, दुचाकीसह अन्य वाहनांचे १५ अपघात झाले. या अपघातात ३६ जण जखमी झाले. या जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार झाल्यानंतर ते बरे झाले. याशिवाय बिगर जखमी अपघात दोन झाले असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
-----------
रात्री अन् पहाटेच अपघात...
बरेच वाहनचालक रात्रीच्या वेळी दारू पिवून गाडी चालवितात. शिवाय गाडीचा वेगही अधिक प्रमााणात असतो. वेगाचं नियंत्रण न झाल्याने अनेक अपघात घडतात. शिवाय झोपेत गाडी चालविल्यामुळेही रात्री व पहाटेच्या सुमारास अपघातासारख्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
-----------
हेल्मेट, सीट बेल्ट विसरू नका...
गाडी चालविताना मोटार वाहन कायद्यांचे तंतोतत पालन करावे करावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये. दुचाकी चालविताना हेल्मेट अन् चारचाकी चालविताना वाहनधारकांनी सीट बेल्ट लावायला विसरू नका. वेगात गाडी चालवू नका. वेळेआधी निघा अन् वेळेपुर्वी पोहोचा असा सल्ला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिला आहे.
---------
खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. रस्त्यावर जड वाहतुकीबरोबरच चारचाकी वाहनेही वेगाने धावू लागले आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अपघाताची संख्या वाढत असून वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करावा, अतिवेगात वाहन चालवू नये.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.