धक्कादायक ; पोलिसाने विष पाजून पोलीस पत्नीस करायला लावला गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:34 PM2018-07-26T13:34:25+5:302018-07-26T13:47:15+5:30
सोलापूर : पोलीस वसाहतीत पोलीस पत्नीस जबरदस्तीने विष पाजून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलीस पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ५ जुलै रोजी सोलापूर येथे घडला. मात्र ही घटना गुरूवार २६ जुलै रोजी समोर आली़
सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दामिनी मार्शल पूनम काळे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या प्रकरणी पोलीस पती विलास सर्जेराव शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्यादी या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहेत.
फिर्यादी पूनम काळे हिचा आरोपी विलास शिंदे याच्याबरोबर विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पती विलास शिंदे, त्याची पहिली पत्नी शोभा शिंदे, त्याचा मामा भीमा काळे हे फिर्यादी पूनम काळे हिच्याकडे पैशाची मागणी करत होते. आरोपी विलास हा तिला गर्भपात कर म्हणून मागे लागला होता. त्यावरुन दोघांमध्ये नेहमी वादावादी होत असे.
५ जुलै रोजी सकाळी सुमारास आरोपी पतीने पत्नीकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीस जबरदस्तीने विष पाजून तो पळून गेला. या प्रकरणी फिर्यादीची बहीण रामेश्वरी काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी ही रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्यानंतर आरोपीने दमदाटी करुन तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली.