धक्कादायक; स्वॅब टेस्ट दिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:42 PM2020-06-12T14:42:39+5:302020-06-12T14:46:27+5:30
सोलापूर महापालिका आरोग्य केंद्रातील गलथान कारभार; अहवाल पॉझिटिव्ह येताच तो कर्मचारी क्वारंटाईन झाला
राकेश कदम
सोलापूर : महापालिकेच्या मजरेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक लिपिक स्वॅब टेस्ट देऊन कामावर रुजू झाले. टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाºयांमध्ये खळबळ माजली. यामुळे आरोग्य केंद्र्रातील गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आल्याची चर्चा सुरू झाली.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वॅब टेस्ट दिल्यानंतर अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन होणे अपेक्षित असल्याचे मनपाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे संकेत पाळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. टेस्ट दिल्यानंतर हे कर्मचारी सर्वत्र फिरत असतात. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन होतात. याचा फटका इतर कर्मचाºयांना बसतो. हा प्रकार कमजोर प्रकृती असलेल्या कर्मचाºयांच्या जीवावर उठणारा असल्याची टीका नगरसेवकांकडून होत आहे.
मजरेवाडी आरोग्य केंद्रातील एका लिपिकाने चार दिवसांपूर्वी स्वॅब टेस्ट दिली होती. त्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत हा कर्मचारी आरोग्य केंद्रात काम करीत होता. स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगिल्यानंतर तो घरी गेला. हे वृत्त ऐकून इतर कर्मचारी धास्तावले. दुपारनंतर आरोग्य केंद्रातील इतर कामही बंद ठेवण्यात आले. मजरेवाडी आणि परिसरातील अनेक नागरिक गुरुवारी सकाळी या आरोग्य केंद्राजवळ आले. बरेच नागरिक सकाळी साडेदहापर्यंत या ठिकाणी थांबून होते. कोरोनाचा रुग्ण आढळल्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे आरोग्य केंद्र एक दिवस बंद ठेवले आहे, असा निरोप नागरिकांना देण्यात आला. त्यानंतर अनेक नागरिकही धास्तावल्याचे दिसून आले.
‘त्या’ कर्मचाºयाला का बोलावले ?
- स्वॅब टेस्ट दिलेल्या कर्मचाºयाला कामावर बोलावणे योग्य नाही. कोरोनाचा रुग्ण आढळला म्हणून संपूर्ण आरोग्य केंद्र आणि फीवर ओपीडी बंद ठेवणे योग्य नाही. पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. मजरेवाडी आरोग्य केंद्रातील प्रकाराबाबत आरोग्य अधिकारी माहिती घेतील. याबद्दल निश्चित कार्यवाही होईल, असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाºयांची काळजी घेत नसल्याचे आम्ही वारंवार सांगतोय. एखाद्या कामगाराची कोरोना टेस्ट घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत त्याला कामावर बोलावणे योग्य नाही. मजरेवाडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी याबद्दल जागरुक राहणे गरजेचे होते. आयुक्तांनी यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करायला हवी.
- अशोक जानराव, कामगार नेते, मनपा.