धक्कादायक; रसायनाचा वापर करून तंबाखूची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:28 AM2020-02-07T10:28:57+5:302020-02-07T10:31:20+5:30
ग्लिसरीन लावून तंबाखू विकणाºयास सोलापुरात अटक; तंबाखूला विविध प्रकारचे सेंट लावण्याचा प्रकार
सोलापूर : ग्लिसरीनद्वारे तंबाखूला विविध प्रकारचे सेंट लावून विक्री करणाºया शिवानंद आळगुंडगी (रा. २५६ गाळा, रविवारपेठ, सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला अक्कलकोट रोडवरील गांधी नगरात राहणारे रामचंद्र चिलवेरी यांच्या जागेत खोली भाड्याने घेऊन सुगंधी तंबाखू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न निरीक्षक दयानंद पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. खांडेकर, नाईक पृथ्वीराज फुटाणे, महेश शिंदे, भारत गायकवाड यांच्या मदतीने तेथे छापा मारला. आरोपी शिवानंद आळगुंडगी याने तेथे सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना थाटल्याचे दिसून आले.
रसायनाचा वापर करून सुगंधी तंबाखू करण्यास कायद्याने बंदी आहे. असे असताना आरोपी शिवानंद हा हैदराबाद, विजयपूर, मुंबई येथून तंबाखू खरेदी करून सोलापुरात आणत होता. या खोलीत गॅसस्टोव्हवर भांडे ठेवून ग्लिसरीनच्या साह्याने तंबाखू भाजत होता व त्यानंतर त्याला हिरा, केशर, हिना, अत्तर, गुलाब, मोगरा अशा प्रकारचे सेंट लावून सुगंध भरत होता. रसायनापासून बनविलेल्या सुगंधी तंबाखूचे अर्धा किलोचे प्लास्टिक पिशवीत पॅकिंग बनवून ग्रामीण भागातील पानटपºयांना विक्रीसाठी पुरवत होता. अशाप्रकारे ५ हजाराला ३० किलोचे तंबाखूचे पोते विकत आणून सुगंध लावून ४०० रुपये किलो विकत होता.
पोलिसांनी घटनास्थळी ५०० ग्रॅमची १२६० पाकिटे व ३० किलो तंबाखूचे एक पोते, ग्लिसरीन व सेंटचे डबे, गॅसशेगडी जप्त केली. ही कारवाई पोलीस निरिक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपी आळगुंडगी याला न्यायालयासमोर हजर केल्यावर दोन दिवस पोलीस कोठडीत देण्यात आली.