धक्कादायक; खासगी जीपच्या गर्दीत धक्काबुक्की, परीक्षेसाठी मुली हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 03:36 PM2022-02-24T15:36:59+5:302022-02-24T15:37:04+5:30
शाळेतील हजेरी घटली : विद्यार्थी जीव धोक्यात घालून करतात खासगी वाहनाने प्रवास
सोलापूर : मागील अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा दु:खवटा सुरू असल्यामुळे एस.टी.चे वेळापत्रक कोलमडलेले आहे. या काळात कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा जास्त परिणाम दिसून आला नाही, पण सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पण, एस.टी. गाड्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकर गाड्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
सोलापूर विभागातून सर्व आगारातून म्हणजेच नऊ आगारांतून गाड्या सुरू आहेत. पण, सध्या विभागातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू आहेत. ही संख्या पूर्वीच्या तुलनेत तीस टक्क्यांपर्यंतच आहे. ग्रामीण भागातील गाड्या सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची हजेरी कमी झाली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणातून मुली व महिला या खासगी वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत. यामुळे एस.टी. गाड्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार होत असूनही एस.टी. प्रशासन हतबल असल्याचे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून बऱ्याचपैकी गाड्या सुरू झालेल्या आहेत. यासाठी एस.टी.ला खासगी चालकांची मदत घ्यावी लागली. सध्या सोलापूर आगारातून दिवसाकाठी जवळपास दीडशे फेऱ्या होत आहेत. यामुळे एस.टी.चे उत्पन्न हे आठ ते नऊ लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत.
बऱ्हाणपूर मार्गे अक्कलकोट एस.टी. कधी होणार सुरू
एस.टी.चे कर्मचारी कामावर हजर न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक मार्गावर एस.टी. गाड्या धावलेल्या नाहीत. यात बऱ्हाणपूर मार्गे अक्कलकोटमधील किनीवाडी, तिर्हे मार्गे पंढरपूर, काडगाव मार्गे तुळजापूर, मोहोळमधील काही मार्गांवर अद्यापपर्यंत एस.टी. गाड्या सुरू नाहीत, यामुळे या मार्गावर गाड्या धावणार कधी असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.
एस.टी.ला जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान...
सोलापूर विभागातील नऊ आगारांपैकी उत्पन्नाच्या तुलनेत सर्वांत मोठे आगार म्हणून सोलापूर आगाराकडे पाहिले जाते. या सर्व आगारांचे मिळून जवळपास पन्नास ते साठ लाखांचे उत्पन्न विभागाला मिळत होते. उत्पन्न आता जेमतेम दहा ते वीस लाखांमध्ये आले आहे. त्यामुळे दिवसाकाठी एस.टी.ला जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली
आजच्या निर्णयानंतर कर्मचारी वाढण्याची शक्यता
मागील अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे अनेक कर्मचारी कामावर येण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. पण, दबावापोटी ते कामावर येत नाहीत. पण, मंगळवारी कोर्टाचे निर्णय पाहून जवळपास २० ते ३० टक्के कर्मचारी हजर होऊ शकतात, असा अंदाज एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आम्ही एस.टी.ने प्रवास करताना आम्हाला सुरक्षित वाटते; पण खासगी गाड्यामधून प्रवास करताना प्रत्येक वेळी चांगले असतील याचा अंदाज आम्ही लावू शकत नाही. यामुळे ग्रामीण भागातून येताना आम्हाला नाइलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
- स्नेहल माळगे, प्रवासी