धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:02 PM2019-10-22T14:02:33+5:302019-10-22T14:02:38+5:30
कल्याणनगरमधील प्रकार ; प्रत्येक पावसात हीच परिस्थिती
सोलापूर : घरातील कर्ता पुरूष सोडून गेला, या दु:खात माडेकर कुटुंबीय होते़ रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत मुसळधार पाऊस होता़ रात्री झालेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले़ यामुळे कर्ता पुरूष गेल्याच्या दु:खापेक्षा घरातील पाणी काढत कुटुंबीयांना आपल्या दु:खाला वाट करून द्यावी लागली.
हणुमंतू हुसेनप्पा माडेकर (वय ४७, रा. कल्याणनगर - ३, जुळे सोलापूर ) यांना शनिवारी सकाळी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले़ पण सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली़ यामुळे माडेकर कुुटुंबीयांवर शोककळा पसरली़ अचानक घरातील कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यामुळे माडेकर कुुटुंबीयांवर दु:खाचा डोंंगर कोसळला.
या दु:खातच सर्व कुुटुंबीय होते़ पण रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे माडेकर यांच्या घरात पाणी शिरले. यामुळे कुुटुंबीयांना आपल्या अश्रूंना आवर घालत रविवारी आपल्या घरात आलेले पाणी बाहेर काढत रात्र घालवावी लागली. माडेकर कुुटुंबीय दु:खात असताना शेजारीपाजाºयांनी त्यांच्या घरातील पाणी काढण्यासाठी मदत केली़ रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे घरातील लहान मुलांनाही रात्र पूर्ण जागून काढावी लागली.
घरात दोन मोटार लावून पाणी उपसा
- रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे माडेकर यांच्यासह कल्याणनगर भाग दोनमधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले़ घरातील पाणी माडेकर कुुटुंबीय हे बकेटच्या सहाय्याने काढत होते़ पण तरीही पाणी संपत नसल्यामुळे पाणी ओढणाºया मोटारची मदत घ्यावी लागली़ पाणी काढण्यासाठी दोन मोटार लावण्यात आले़ या मोटारने पाणी काढण्याचे काम सोमवारी सकाळी दहापर्यंत सुरू होते़
रात्रभर पाऊस आल्यामुळे घरात पाणी शिरले़ आमच्या काकाने कष्ट करून बांधलेल्या घरातही त्यांना शेवटची रात्र काढता आली नाही़ याचे जास्त वाईट वाटते़ एकीकडे आमच्या घरातील कर्ता पुरूष गेला या दु:खात होतो़ रात्रभर आम्हाला घरात शिरलेले पाणी काढत बसावे लागले़
- सिध्दाराम माडेकर