धक्कादायक; सावकारीला कंटाळून सोलापुरातील रिक्षाचालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:43 PM2020-09-18T12:43:23+5:302020-09-18T12:46:24+5:30

रिक्षाचालकाच्या खिशातील चिठ्ठीमध्ये निघाले सावकाराचे नाव; नातेवाईकांनी दिली तक्रार : जुनी लक्ष्मी चाळ येथील प्रकार

Shocking; Rickshaw driver commits suicide in Solapur | धक्कादायक; सावकारीला कंटाळून सोलापुरातील रिक्षाचालकाची आत्महत्या

धक्कादायक; सावकारीला कंटाळून सोलापुरातील रिक्षाचालकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे मयत अनिल चांगभले हे रिक्षा चालवून स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतेशिवाय ते डोणगाव रोडवरील बालवीर वाचनालयामध्ये शिपाई म्हणून कामदेखील करत होतेपोलिसांनी पंचनामा केला असता, त्यांच्या खिशामध्ये सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी मिळून आली

सोलापूर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून अनिल नागनाथ चांगभले (वय ५०, रा. जुनी लक्ष्मी चाळ, देगाव रोड) या रिक्षाचालकाने बालवीर सार्वजनिक वाचनालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी खिशामध्ये सापडल्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

 मयत अनिल चांगभले हे रिक्षा चालवून स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शिवाय ते डोणगाव रोडवरील बालवीर वाचनालयामध्ये शिपाई म्हणून कामदेखील करत होते. मुलीचं लग्न व मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांना सावकाराचे व्याज व मुद्दल देणे शक्य झाले नव्हते. लॉकडाऊन संपल्यानंतर मात्र सावकाराने पुन्हा पैशाचा तगादा लावला होता. तीन महिने रिक्षा बंद होती. त्यामुळे अनिल चांगभले यांना सावकाराचे व्याज व मुद्दल देणे शक्य झाले नव्हते. एकीकडे पैसे नव्हते तर दुसरीकडे सावकाराचा तगादा होता.

कर्ज कसे फेडायचे या चिंतेने अनिल यांना ग्रासले होते. अनिल हे बालवीर वाचनालयात शिपाई असल्यामुळे त्याची चावी त्यांच्याकडे होती. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते वाचनालयामध्ये गेले. आतील लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला. सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला असता, त्यांच्या खिशामध्ये सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये सावकाराचे नाव असल्याचे आढळून आले आहे. पोलीस सावकाराचा तपास करत असून नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. 

सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याची सोलापुरातील दुसरी घटना
- सावकाराच्या तगाद्याला कंटाळून जुलै महिन्यात डान्सबार हॉटेल मालक अमोल जगताप यांनी हांडे प्लॉट येथील राहत्या घरी पत्नी व दोन मुलांना गळफास देऊन स्वत:ही आत्महत्या केली होती. अशाच प्रकारे सावकाराच्या तगाद्याला कंटाळून रिक्षाचालक अनिल चांगभले यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.
 

Web Title: Shocking; Rickshaw driver commits suicide in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.