धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन
By विलास जळकोटकर | Updated: May 9, 2024 20:56 IST2024-05-09T20:56:18+5:302024-05-09T20:56:33+5:30
आरोपीस अटक : माझ्याशी लग्न अन्यथा जाळून मारण्याची धमकी

धक्कादायक.. सोलापुरात रिक्षातून येऊन महिला पोलिसाशी असभ्य वर्तन
सोलापूर : राहत्या घरातून ड्यूटीवर निघालेल्या पोलिस महिलेचा रिक्षातून पाठलाग करुन अडवले अन् तिच्याशी असभ्य वर्तन करीत ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जाळून मारेन’ अशी धमकी देण्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी जेलरोड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३५३, ३५४ अन्वये गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी विशाल श्रीकांत सरडगी (रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यास अटक केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी या पोलिस सेवेत आहेत. मतदानाच्या दिवशी ७ मे रोजी त्या घरातून ड्यूटीसाठी निघाल्या होत्या. ७:१५ च्या सुमारास त्यांना ड्यूटीवर हजर व्हायचे होते. स्वत:च्या दुचाकीवरुन निघाल्या असता. पाठिमागून रिक्षातून नमूद आरोपी पाठलाग करीत होता. ड्यूटीच्या ठिकाणी पिडित महिला पोहचल्या असता (एम एच १३ सी टी ५२९९) रिक्षातून उतरुन नमूद मजनूने पिडितेला अडवले आणि ‘माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी तुला जाळून मारुन टाकेन’ अशी धमकी दिली. अंगावर शासकीय गणवेश पकडून असभ्य वर्तन केले.
कर्तव्यावर असताना लाथाबुक्क्याने मारहाण करुन शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मतदानाच्या प्रक्रियेत सर्व यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे संबंधीत नमूद आरोपीला गुरुवारी अटक करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास महिला फौजदार एम. एम. मोरे करीत आहेत.