धक्कादायक; पंढरपुरात पशुखाद्य दुकानात तंबाखूची विक्री...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:25 PM2020-04-27T17:25:36+5:302020-04-27T17:26:44+5:30
पंढरपूर पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली घटना; पशुखाद्य दुकानदारा विरुद्ध कारवाई
पंढरपूर : शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने संचार बंदीच्या काळात खत विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन पंढरपुरातील एक जण पशुखाद्याच्या दुकानात तंबाखूची विक्री करत असल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे हे पंढरपुरातील नवीपेठ मध्ये ज्ञानेश्वर रामचंद्र कुलकर्णी या पशुखाद्य दुकानात अचानकपणे तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दुकानात वैभव विलास कुलकर्णी हजर होते. पुरवठा निरीक्षक शिंदे यांनी दुकानातील मालाची तपासणी केली असता, तंबाखूच्या पुड्या सापडल्या.
सापडलेल्या तंबाखू संदर्भात दुकानदाराला माहिती विचारली, त्याला समर्पक उत्तर देता आले नाही. त्याचबरोबर त्याने त्या तंबाखू पुड्या दुकानात विक्रीसाठी ठेवले असल्याचे पुरवठा निरीक्षक शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वैभव कुलकर्णी यांच्याविरुद्ध पुरवठा विभागाने कारवाई केली आहे.