धक्कादायक; लैंगिक संबंधातून वाढतोय ‘हिपॅटायटीस बी, सी’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 03:56 PM2022-04-15T15:56:58+5:302022-04-15T15:57:04+5:30
रक्त पुरवठ्यातूनही होतो प्रसार : दीर्घकाळ घ्यावे लागतात उपचार
सोलापूर : शरीरसंबंधातून हिपॅटायटीस बी व सीचा (कावीळ) धोका वाढल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे याची लागण झालेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यातून मोफत औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.
सर्वसामान्यपणे कावीळचे पाच प्रकार आढळतात. यामध्ये दूषित पाण्यापासून होणाऱ्या कावीळला ‘हिपॅटायटीस ‘ए’ असे संबोधले जाते. ‘डी’ व ‘ई’ प्रकारची कावीळ अशाच दूषित पदार्थातून होणारी आहे; पण ‘बी’ व ‘सी’ या प्रकारची कावीळ रक्ताच्या संसर्गातून होते. ही कावीळ बराच काळ राहत असल्याने दुर्लक्ष केल्यास धोकादायक आहे. यावर औषध नाही म्हणून बाधित लोक गावठी इलाज करताना दिसून येतात; पण आता यापैकी कुठलाही आजार झालेल्या रुग्णांचे नैराश्यजनक चित्र पूर्णपणे बदलले आहे. योग्यवेळी निदान झाल्यास ‘हिपॅटायटीस सी’ पूर्ण बरा होतो आणि ‘हिपॅटायटीस बी’ हा पूर्ण आटोक्यात राहू शकतो. ‘हिपॅटायटीस सी’वर अद्याप लस नाही आणि ‘हिपॅटायटीस बी’ची लस ही जरूर असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना योग्य सल्ल्यानुसार दिल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील औषधशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विठ्ठल धडके यांनी दिली.
यामुळे होतो संसर्ग
देशांमध्ये यकृत बिघडण्याचे सर्वाधिक दिसून येणारे कारण म्हणजे, ‘हिपॅटायटीस बी.’ या हिपॅटायटीस विषाणू बऱ्याच प्रकारे शरीरात प्रवेश करू शकतो. स्त्रियांना गरोदरपणात या आजाराने ग्रासल्यास अर्भकालाही प्रसूतीच्या काळात ‘हिपॅटायटीस बी’चा संसर्ग होऊ शकतो. हा आजार असलेल्या बालकांशी खेळणाऱ्या इतर बालकांनाही त्याचा संसर्ग संभवतो. त्याचबरोबर टॅटू करताना, सुईने टोचून अमली पदार्थांचे सेवन आणि लैंगिक संबंधांद्वारेही ‘हिपॅटायटीस बी’चा संसर्ग होऊ शकतो. रक्त घेणाऱ्या व डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांनाही हा धोका असतो.
असे होते निदान
हा आजार झाल्याचे बहुतांश रुग्णांना कळत नाही. ‘एचबीएसएजी’ ही तपासणी केल्यावर हा संसर्ग झाल्याचे कळते. ही तपासणी साधारणपणे गरोदर स्त्रिया, डायलिसिसवर असणारे रुग्ण, हेल्थ चेकअप, किमोथेरपी घेणारे लोक आणि हिपॅटायटीस झालेल्यांचे नातेवाईक या सर्वांसाठी केली जाते. २० वर्षांपूर्वी अशा पीडितांसाठी कोणतीही उपाययोजना उपलब्ध नव्हती. पूर्वी डॉक्टरांना हतबल करणारा हा रोग रोज एक गोळी घेऊन आता पूर्णपणे आटोक्यात ठेवता येतो.
शासकीय रुग्णालयात औषधे
सोलापूर शहर व जिल्ह्यात असे रुग्ण आढळले आहेत. यावर मात करण्यासाठी एक गोळी मात्र नित्यनेमाने घ्यायला हवी; पण त्यासाठी हा आजार फार विकोपाला गेलेला नसावा. शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांना मोफत गोळ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘हिपॅटायटीस बी’ हा विषाणू रुग्णांना बऱ्याचदा कामस्वरूपी ग्रासतो. एखाद्या रुग्णाची प्रतिकारशक्ती या विषाणूवर पूर्ण मात करते आणि हा विषाणू कायमस्वरूपी निकामी होतो. असे न झाल्यास दहा ते तीस वर्षांच्या कालावधीत यकृत हळूहळू या विषाणूमुळे खराब होते, असे डॉ. धडके यांनी सांगितले.