धक्कादायक; सोलापूर जिल्हा ‘ऑक्सिजन’वर, ‘सिलिंडर’साठी अनेक रुग्णालयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:57 PM2021-04-19T13:57:13+5:302021-04-19T13:57:46+5:30

दिलीप मानेंचा ठिय्या : आवश्यकता ५६ मेट्रिक टनांची, उत्पादित होतोय ४६ मेट्रिक टन

Shocking; Solapur district on 'Oxygen', many hospitals rush for 'cylinder' | धक्कादायक; सोलापूर जिल्हा ‘ऑक्सिजन’वर, ‘सिलिंडर’साठी अनेक रुग्णालयांची धावपळ

धक्कादायक; सोलापूर जिल्हा ‘ऑक्सिजन’वर, ‘सिलिंडर’साठी अनेक रुग्णालयांची धावपळ

googlenewsNext

सोलापूर : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची मागणी प्रचंड वाढली आहे. एक-एक सिलिंडर मिळविण्यासाठी महापालिकेेसह खासगी रुग्णालयांची धावपळ सुरू आहे. नर्मदा हॉस्पिटलसाठी तातडीने सिलिंडर मिळावे यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी रविवारी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत होटगी रोड एमआयडीसीतील ऑक्सिजन प्लांटबाहेर ठिय्या मारला. सकाळी पुन्हा या ठिकाणी जाऊन सिलिंडर घेऊन गेले.

जिल्ह्यात टेंभुर्णी, चिंचोली एमआयडीसी आणि होटगी रोड येथील एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते. जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार या तीन प्लांटमध्ये एकूण ४६ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. सध्या जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी दररोज ५६ मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यक असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. सिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय हॉस्पिटलसह इतर मोठ्या रुग्णालयांना परराज्यातून लिक्वीड ऑक्सिजन मिळतो. राज्यात सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई असल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांना बाहेरून पुरवठा होण्यास विलंब लागत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्सिजनची अधिक मागणी आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजन लेव्हल कमी झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने ताण वाढला आहे. एक-एक सिलिंडरसाठी रुग्णालयांची धावपळ सुरू आहे.

महापालिकेने पुन्हा घेतले सिव्हिलमधून ऑक्सिजन

मनपाच्या बॉईस हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आवश्यक आहेे. मागील आठवड्यात बॉईस हॉस्पिटलमध्ये तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता. रविवारी सकाळी अशीच परिस्थिती होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांना सकाळी सिव्हिलमध्ये जाऊन सिलिंडरच्या टाक्या ताब्यात घेतल्या. अनर्थ होतो की काय, अशी भीती या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शहरातील अनेक रुग्णालये अचानकपणे जिल्हा प्रशासनाकडे मागणी नोंदवत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

या रुग्णालयांची दररोज पळापळ

नर्मदा हॉस्पिटलमध्येही रविवारी ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होण्याची स्थिती होती. या हॉस्पिटलचे चेअरमन दिलीप माने यांनी रविवारी रात्री १२ वाजताच होटगी रोडच्या प्लांटबाहेर ठिय्या मारला. सिलिंडरची पहिली गाडी पहाटे मिळाली. सकाळी ११ वाजता पुन्हा प्लांटमध्ये जाऊन आवश्यक ते सिलिंडर ताब्यात घेतले. कादरी हॉस्पिटल, धनराज गिरजी, प्राइड हॉस्पिटल, सीएनएस, मोनार्क या रुग्णालयांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी दररोज धडपड करावी लागत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी जिल्ह्यातील तीन प्लांटसह बाहेरूनही ऑक्सिजन मिळतो. ही साखळी व्यवस्थित असावी असा प्रयत्न आम्ही करतोय. रुग्णालयांकडून अचानक ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली जाते. रुग्णालयांनी एक दिवस आधी कल्पना दिली तर आम्ही त्यांची अडचण सोडवू शकतो.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

 

Web Title: Shocking; Solapur district on 'Oxygen', many hospitals rush for 'cylinder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.