धक्कादायक; मुलानेच केला बापाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:06 PM2020-01-21T12:06:06+5:302020-01-21T12:08:09+5:30
कृषी सहायक अंगद घुगे खून प्रकरण; उस्मानाबाद येथून अटक; पाच दिवस पोलीस कोठडी
कुर्डूवाडी : लऊळ (ता. माढा) गावच्या हद्दीत कृषी सहायक अंगद सुरेश घुगे यांच्या झालेल्या खूनप्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्यांचाच मुलगा विशाल अंगद घुगे (वय २२, सध्या रा. बार्शी, मूळगाव भालगाव) याला पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा उस्मानाबाद येथून अटक केली. त्याला सोमवारी दुपारी माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. सय्यद यांच्या न्यायालयात पोलिसांनी उभे केले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बापाच्या खुनात लेकाला संशयित आरोपी म्हणून अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे तीन वाजता खुनात वापरलेली पांढºया रंगाची कार बार्शी येथून (एमएच १२, ए ७७७८) ताब्यात घेतल्यानंतर तपास यंत्रणेची चक्रे वेगाने फिरली गेली. त्यामधील आढळलेल्या रक्ताच्या डागावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला गेला. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित आरोपी म्हणून कृषी सहायक अंगद घुगे यांचा मुलगा विशाल घुगे याच्याबरोबर इतरांचा खुनात हात असल्याचा संशय आला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घुगे खून प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांची पथके भालगाव, बार्शी, उस्मानाबाद, पुणे व लऊळसह इतर परिसरात तळ ठोकून आहेत. सध्या मुलगा विशाल घुगे याला अटक केल्यानंतर खुनाचे आणखी धागेदोरे मिळतात का? याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे विशालच्या संबंधीत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनेकांची चौकशी सुरू आहे. खून का केला व कशासाठी केला, यामध्ये मास्टर मार्इंड कोण आहे, प्रामुख्याने कोणाकोणाचे हात आहेत याची माहिती संशयितांकडून पोलीस घेत आहेत. त्यासाठी न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत संशयित आरोपी विशाल घुगेलाही पोलीस कोठडी दिली आहे. माढा न्यायालयात संशयित आरोपीच्या वतीने अॅड. हरिश्चंद्र कांबळे तर सरकार पक्षातर्फे अॅड. विशाल सक्री यांनी काम पाहिले.
नातलगांचा सहभाग आहे का? पोलिसांचा तपास
- अंगद घुगे खुनातील सर्व मारेकºयांच्या जवळपास पोलीस पोहोचले आहेत. खुनात नातेवाईकांसह इतर तीन ते पाच आरोपी असण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. पोलीस सध्या त्या दृष्टीने तपास करीत आहेत. लऊळ हद्दीत मृतदेह सापडल्याने माढा तालुक्यातील काही संशयित आरोपींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.