धक्कादायक; सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत घोळच घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:25 AM2020-06-27T11:25:46+5:302020-06-27T11:28:24+5:30
आरोग्य खात्याचा गोंधळ कारभार; एकाच रुग्णाचा दोनदा येत आहे रिपोर्ट; नातेवाईक झाले त्रस्त..
सोलापूर : सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या आकडेवारीतील घोळ उघडकीस आल्यानंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून एकाच रुग्णाचे दोनदा अहवाल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
भवानीपेठेतील एका नगरसेवकाच्या पत्नीची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात उपचार घेत असताना पुन्हा चार दिवसांनी आरोग्य खात्याचे कर्मचारी घरी आले व तुमच्या घरातील दोघांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, उपचारास न्यावे लागेल, असे सांगू लागले.
त्यावेळी घरातील मंडळींनी दोन्ही रुग्ण यापूर्वीच रुग्णालयात अॅडमिट असल्याचे सांगितले. यापूर्वीच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा नवा अहवाल कोठून आला, अशी त्यांच्या घरच्यांनी विचारणा केल्यावर कर्मचारी आल्या पावली परतले आहेत.
नातेवाईकांना मृतदेह देण्यास होतेय घाई..
शाहीर वस्तीतील एका किराणा दुकानदाराचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांना ज्या रुग्णालयात उपचारास दाखल केले होते, तेथील प्रशासनाने नातेवाईकांना मृतदेह नेण्याचा आग्रह केला. यावर एका नगरसेवकाने रिपोर्ट आला का अशी विचारणा केली, त्यावर अहवाल अद्याप आलेला नाही, असे सांगून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात न्यायचा आहे, अशी सारवासारव त्या रुग्णालयातील कर्मचाºयांनी केली. त्यावर त्या नगरसेवकाने समन्वय अधिकारी पांडे यांच्याशी संपर्क साधून अहवालाविषयी चौकशी केली. त्यानंतर त्या किराणा दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी म्हणाले पाहतो..
मृत्यूच्या घोळानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी दुबार होत असल्याचा प्रकार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनाला आणण्यात आला. त्यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लक्ष घालण्याची सूचना केली आहे. त्यावर शंभरकर यांनी यात नेमके काय घडले आहे हे पाहतो, असे म्हटले आहे.
कारवाई अद्याप नाही
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मृत्यूच्या नोंदीबाबत घोळ करणाºया अधिकाºयांना नोटिसा दिल्याचे सांगितले. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा घोळ करणाºया अधिकाºयांवर कारवाई करून तत्काळ अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तरीही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.