धक्कादायक; त्रास देणाऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहून करमाळ्यातील शिक्षकाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 08:45 AM2021-07-23T08:45:13+5:302021-07-23T08:45:20+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
करमाळा : ‘रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल यांना १४ लाख रुपये देऊनही जमिनीचा ताबा देत नाहीत. उलट मलाच दोघेही दम देत आहेत. रानाकडे दिसला तर तुझा पाय काढीन व हात काढीन असं म्हणत आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे’ अशा मजकुराची चिठ्ठी बळीराम वारे या सहशिक्षकाने लिहून गणेश नगर येथील राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
यात आत्महत्या केलेल्या वारे यांचा मुलगा अनिकेत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिट्टीत नाव असलेल्या रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल (रा.गुळसडी) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुरुवारी (ता. २२) गुन्हा दाखल झाला आहे.अनिकेत बळीराम वारे (वय १९) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (ता. २१) मी, वडील, आई व बहिण असे रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण करून झोपी गेलो. वडील टीव्ही पाहत बसले होते. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी धावत किचनमध्ये गेलो. तेव्हा वडिलांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा वडिलांची हालचाल बंद होती. त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आलो. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पहाटे ३ वाजताच्या सुमारास वडील टीव्ही पाहत बसले होते तेव्हा टीव्ही बंद करून आईने झोपण्यास सांगितले व आई झोपी गेली.सकाळी सात वाजता उठून काम करण्यास किचनमध्ये गेली. तेव्हा वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यावर काळया पेनाने वडिलांच्या हस्तक्षरामध्ये ‘रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल यांना मी १४ लाख रुपये दिले. तरीही जमिनीचा ताबा देत नाहीत. उलट मलाच दोघेही दम देतात. रानाकडे दिसला तर तुझा पाय काढू, हात काढू म्हणत आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले असे चिठ्ठीत म्हटले आहे.