धक्कादायक; कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 01:00 PM2021-04-29T13:00:56+5:302021-04-29T13:01:03+5:30
कोरोनामुळे एका शिक्षिकेचा मृत्यू : २४ मार्च रोजी विम्याची मुदत संपली
सोलापूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. केंद्र सरकारतर्फे कोरोनासंबंधी काम करणाऱ्या शिक्षकांसह सर्वांनाच ५० लाखांचा विमा जाहीर करण्यात आला होता. मार्च महिण्यात त्याची मुदत संपली असून पुन्हा याचे नूतनीकरण झाले नाही.
मागील वर्षभरापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवासुध्दा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात आले होते. त्याची मुदत २४ मार्च रोजी संपली. सध्या कोरोनाची दुसरी लाट असून अनेक जणांना हा आजार होत आहे. या परिस्थितीत शिक्षकांनी ट्रेसिंग, सर्वेक्षण, समन्वय आदी काम करावे लागत आहे. हे काम करत असताना शिक्षकांना विमा संरक्षण कवच देण्यात आलेले नाही.
आरोग्यसेवेचे कुठलेही प्रशिक्षण नसताना शिक्षकांना भीतीयुक्त वातावरणात काम करावे लागत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. तसेच या शिक्षकांना लसीकरण सुध्दा करण्यात आलेले नाही. विमा संरक्षण नसल्यामुळे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना लाभ मिळाला नाही. सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या तर वाढते आहे, मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जे शिक्षक कोरोना रोखण्यासाठी सेवा देत आहेत, त्यांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
विम्याची सुविधा ही फक्त शिक्षकांसाठी नाही तर कोरोनाचे काम करणाऱ्या सर्वांसाठीच होती. कोरोनासंबंधी काम करणाऱ्या सर्वांसाठी ५० लाखांचा विम्याची सुविधा होती. त्याची मुदत मार्च महिण्यात संपली. या विम्याच्या नूतनीकरणाविषयी अजूनतरी काही माहिती आली नाही. यासंबंधी शासन आदेश काढेल.
- कादर शेख, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ
शिक्षकांकडून कोरोना संबंधित काम करवून घेत असताना सर्वच शिक्षकांना मास्क, सॅनिटायजरसारख्या सोयी द्यायलाच हव्यात. रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था हवी. तसेच लसीकरणात त्यांना प्राधान्य द्यायला हवा.
- सुनील चव्हाण, शिक्षक
मागील एक वर्षात शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. त्यात दोन शिक्षक तर एक शाळेतील क्लर्क आहे. यापैकी कुणाच्याही कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळाला नाही.
- गुरुनाथ वांगीकर, शिक्षक
कोरोनासंबंधी काम शिक्षकांना लावत असताना विनाअनुदानित, टप्प्या-टप्प्याने अनुदान मिळालेल्या शाळेतील शिक्षकांना सूट द्यावी. या शिक्षकांना वेतनच पूर्ण मिळत नसताना त्यांना काही झाले तर ते उपचाराचा खर्च करू शकणार नाहीत.
- संतोष गायकवाड, शिक्षक
- कोरोना साथ नियंत्रण मोहिमेत जिल्ह्यातील शिक्षक - २६००
- शिक्षकाचा मृत्यू - १
- कुटुंबीयांना विमा मिळाला - ००