धक्कादायक; पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेप दोनच वर्षात निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:46 PM2022-04-13T17:46:26+5:302022-04-13T17:46:32+5:30
वारकरी संप्रदाय आणि भाविकांत तीव्र नाराजी
पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. आतापर्यंत चार वेळा पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र दोन वर्षात रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघू लागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पायावरील दर्शन पूर्णपणे बंद होते. याच २३ आणि २४ जुलै २०२० या कालावधीत पुरातत्त्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. यानंतर हा लेप पुढील ७ ते ८ वर्षे तसाच राहील, असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर २ एप्रिल २०२२ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पूर्वी होणाऱ्या वारंवार पंचामृताच्या अभिषेकाने मूर्तीची झीज होत असल्याने अभिषेक बंद करण्यात आला होता. मूर्तीवर आतापर्यंत ४ वेळा वज्रलेप करण्यात आला. रुक्मिणी मातेची मूर्ती शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे. या पायावर दरवेळी वज्रलेप केला जातो. श्री रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने पायाची दुरवस्था झाली आहे.
यापूर्वीही श्रीच्या मूर्तीचे लेपन झाले होते
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन होण्यासाठी १९९८, २००५, २०१२ आणि चौथा वज्रलेप २३ जुलै रोजी पुरातत्त्व विभागाचे उपाधीक्षक आणि रसायनशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या टीमने पूर्ण केला आहे.
श्री रुक्मिणी मातेच्या चरणाचा वज्रलेप निघतोय, तो कसा निघाला, का निघाला याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला आहे. तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून दोन्ही मूर्ती संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील.
- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती