धक्कादायक; मेडिकल परवाना एकाचा, औषध विकणारा दुसराच!

By Appasaheb.patil | Published: August 23, 2022 04:45 PM2022-08-23T16:45:52+5:302022-08-23T16:46:54+5:30

धक्कादायक; त्रुटी आढळलेल्या ४० मेडिकलवर कारवाई

Shocking; The medical license of one, the drug seller is the other! | धक्कादायक; मेडिकल परवाना एकाचा, औषध विकणारा दुसराच!

धक्कादायक; मेडिकल परवाना एकाचा, औषध विकणारा दुसराच!

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : कोरोनाकाळात औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. दरम्यान, औषध विक्री (मेडिकल) ची दुकानेही वाढली. मात्र, याच काळात मेडिकल परवाना एकाचा अन् औषध विकणारा दुसराच, असे अनेक दुकानांत धक्कादायक चित्र ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. औषध विभागाने दिलेल्या नियमांचे पालन न करणे व विविध त्रुटी आढळून आलेल्या ४० मेडिकलवर कारवाई करण्यात आली असून, यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती औषध विभागाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

माणसाची खरी संपत्ती म्हणजे, त्याचे आरोग्य होय असे महात्मा गांधीजी म्हणाले होते. परंतु, सध्याची जीवनशैली आणि दिनक्रम तसेच हवामानाच्या परिस्थितीत अविश्वसनीय बदल यामुळे सामान्य माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शुगर, बीपी, हृदयरोग, मानसिक आजार यांसह अन्य आजाराने ग्रस्त असलेले अनेक लोक औषध घेतल्याशिवाय घराबाहेर पडतच नाहीत. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक लोक औषधांवर अवलंबून राहून काम करत असतात हे सत्य आहे.

--------

१५ मेडिकल परवाने निलंबित

औषधांवरील वैधता तारीख संपणे (एक्सप्रायरी डेट), दुकानात फार्मसिस्ट नसणे, औषध खरेदीनंतर बिल न देणे, वाढीव पैसे घेऊन औषधं देणं, मेडिकल परवाना एकाचा अन् औषध विकणारा दुसराच, अशा विविध त्रुटी आढळल्याने एप्रिल २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ अखेर जिल्ह्यातील १५ मेडिकल परवाने निलंबित करण्यात आले.

----------

जिल्ह्यात ३५०० मेडिकल

सोलापूर शहर व जिल्ह्यात ऑगस्ट २०२२ अखेर ३५०० मेडिकलची नोंदणी औषध विभागाकडे झाली आहे. कोरोनाकाळात मेडिकल दुकानांना मोठी गर्दी दिसून येत होती. त्याकाळात मेडिकलचे महत्त्व कळाल्याने अनेक जण या व्यवसायाकडे वळाल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यात मेडिकल दुकानांची संख्या वाढली आहे.

----------

मेडिकल दुकानांनी या गोष्टी पाळायला हव्यात

  • - मेडिकल दुकानात फार्मासिस्टशिवाय औषध-गोळ्यांची विक्री करू नये
  • - एमआरपीपेक्षा ज्यादा दराने औषधांची विक्री करू नये
  • - प्रत्येक औषधाचे रितसर बिल ग्राहकांना देणे बंधनकारक
  • - परवान्याशिवाय मेडिकल दुकान थाटणं चुकीचेच

--------

परवाना कोणाचा अन् चालवतंय कोण ?

अनेक मेडिकल दुकाने चुकीच्या पद्धतीने चालविण्यात येतात. औषध विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याचेही अनेक धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. शिवाय, अतिरिक्त दरही अनेक औषधांवर घेतले जाते असेही एकाने सांगितले. सगळ्यात मेडिकल दुकानात औषध खरेदीनंतर पावती मिळते असे नाहीच.

--------

औषध विभागाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे कायद्याने सर्व मेडिकल परवाने धारकांना बंधनकारक आहे. कोणी त्याचे पालन करीत नसेल अथवा मेडिकल दुकानात त्रुटी आढळून आल्यास संबंधित मेडिकल दुकानांचा परवाना रद्द अथवा निलंबित करण्यात येतो. कुठे नियमबाह्य व चुकीचे काम चालू असल्यास औषध विभागाशी संपर्क करावा.

- धनंजय जाधव, सहायक आयुक्त, औषध, सोलापूर

 

Web Title: Shocking; The medical license of one, the drug seller is the other!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.