धक्कादायक; मतिमंद मुलाला फास देऊन वृद्ध माताही लोखंडी ॲंगलला लटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 06:27 PM2022-05-31T18:27:55+5:302022-05-31T18:28:01+5:30
सोलापुरातील शिवगंगा नगरातील घटना : जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंद
सोलापूर : ४२ वर्षाचा मुलगा मतिमंद आहे, आपल्या पश्चात त्याचं कसं होणार? हा प्रश्न मनाला भेडसावत असलेल्या वृद्ध आईने प्रथमत: त्याला साडीने गळफास दिला. मुलगा लटकताच आईनेही गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. हा दुर्दैवी प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आला.
मयत उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (वय ६२) ही आपला पती सिद्धेश्वर पुराणिक, मोठा मुलगा दिग्विजय (वय ४२ रा. शिवगंगा नगर, शेळगी), मृत्युंजय, धनंजय व अंजनेय यांच्यासमवेत शिवगंगा नगरात राहत होत्या. मोठा मुलगा हा लहानपणापासून मतिमंद होता. मृत्युंजय व धनंजय हे दोघे मंदिरात पुजारी आहेत. चार नंबरचा मुलगा अंजनेय हा एका कारखान्यात कामाला आहे. दिग्विजय हा मतिमंद असल्याने काही काम करत नव्हता, वडील सिद्धेश्वर यांच्या पायाला मार लागल्याने तेही घरात बसून असतात. आई उमादेवी हीदेखील घरकाम करत होती. तिन्ही मुलांची लग्ने झाली हाेती, त्यामुळे त्यांची चिंता आईला नव्हती. मोठा मुलगा मतिमंद असल्याने त्याचे लग्न झाले नव्हते.
रविवारी रात्री दोघांनी जेवण केले, त्यानंतर ते झोपण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले. धनंजय हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी जाण्याकरिता पहाटे उठले होते. तेव्हा त्यांना आपला मोठा भाऊ व आई दोघे जिन्याच्या लोखंडी ॲंगलला गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ ही माहिती जोडभावी पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात दाेघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
पतीनेही घेतला होता आत्महत्येचा निर्णय
० मुलगा दिग्विजय हा आजारी होता, त्यामुळे त्याला दवाखान्याला घेऊन जायचे होते. आई उमादेवी यांनी त्याला दवाखान्याला घेऊन जाण्यासाठी दोन नंबरच्या मुलाकडे पैशाची मागणी केली होती. मुलाने आपल्याकडे पैसे नाहीत असे म्हटले होते. आम्ही जिवंत आहाेत तर मतिमंद मुलाची ही अवस्था आहे. जर आम्ही मरण पावलो तर याचे कसे होणार, यावर उमादेवी व सिद्धेश्वर या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली होती. पती-पत्नीने मुलाला सोबत घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिद्धेश्वर यांच्या पायाला लागल्यामुळे ते गच्चीवर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे उमादेवी यांनी मुलाला घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा शिवगंगा नगर परिसरात सुरू होती.
शिवगंगा परिसरात हळहळ
० दिग्विजय हा अत्यंत गरीब स्वभावाचा होता. तो उपद्रवी नव्हता. सकाळी उठणे, अंघोळ करून व जेवण करून घराबाहेर जात होता. बऱ्याच वेळा तो आपल्या घरासमोर बसत होता किंवा परिसरात फिरून येत होता. आई उमादेवी हीदेखील शांत स्वभावाची होती. दोघांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.