धक्कादायक; सोलापुरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम निकृष्ट, मग कामगारांचा जीव जाणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:18 PM2022-02-04T19:18:47+5:302022-02-04T19:18:53+5:30
सफाई कामगारांचा जीव धोक्यात; सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष
सोलापूर : कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑक्सिजन मास्क, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट, बाहेरून ऑक्सिजन पुरवणारी साधने पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे ड्रेनेज सफाई कामगारांना सातत्याने मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. दरम्यान, आतापर्यंत ड्रेनेजसफाई करताना पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यूसारखे काम दिसत असतानाही अनेक मयत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पुन्हा हेच काम करायला सुरुवात केली. पुरेशा साहित्याअभावी तेही लाेक दररोज मृत्यूशी झुंज देत आपली उपजीविका भागवत आहेत.
सध्या सोलापूर शहरात स्मार्ट सिटी व अमृत योजनेतून शहराच्या विविध भागांत नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप कामगार नेते अशोक जानराव यांनी केला आहे. काही ठिकाणी तर गरज नसताना ड्रेनेजचे काम केले जात आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे पाईप, साहित्य हेही निकृष्ट दर्जाचे आहे, असेही जानराव यांनी सांगितले. सोलापूर शहरात ड्रेनेज सफाईचे काम करताना सिध्देश्वर सत्याप्पा बनसोडे, सदाशिव महादेव गायकवाड, प्रभाकर महादेव सरवदे, अर्जुन सिद्राम सुरवसे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना महापालिकेने कामावर घेतले.
-------------
ना हाताला मोजे, ना तोंडाला मास्क...
महापालिकेच्या यंत्रणेकडून सफाई, ड्रेनेज साफ करणार्या कर्मचार्यांना आवश्यक त्या सेवासुविधा व साहित्य पुरविले जात नाही. त्यामुळे कर्मचारी आहे त्याच साहित्यावर जीव मुठीत धरून काम करतात अन् मरणाला सामोरे जातात. नाही त्या गोष्टीवर कोट्यावधी रूपये खर्च करणार्या महापालिकेला सफाई कर्मचार्यांच्या साहित्यावर खर्च करण्यास लाज वाटत असल्याचा आरोप कामगार नेते अशोक जानराव यांनी केला आहे.
----------
सोपे नसलेले जीवघेणे काम...
शहरात व नगरपालिका क्षेत्रात ड्रेनेज साफ करणारे हजारो कर्मचारी आहेत. दररोज विविध भागातील ड्रेनेजच्या मॅकव्होलमध्ये उतरून कर्मचारी सफाईचे काम करतात. नव्याने बांधण्यात आलेले ड्रेनेज निकृष्ट व रूंदीला कमी असे बांधण्यात आलेले आहेत. त्यात एकही कर्मचारी व्यवस्थित उतरू शकत नाही असे निमुळते ड्रेनेज बांधकाम केले आहे. अशा बांधकामामुळे लोकांचा जीव जाण्याची वेळ यायला वेळ लागणार नाही.
-----------
शहरातील नव्याने बांधण्यात आलेले सर्व ड्रेनेज निकृष्ट दर्जाचे बांधले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांसह शहरातील नागरिकांना धोक्याचे आहे. पाईपलाइनसाठी निकृष्ट पाईपचा वापर केला आहे. सफाई कर्मचार्यांसाठी हवे असलेले आधुनिक पध्दतीचे साहित्य दिले जात नाही. शिवाय सेवासुविधाही सोलापूर महापालिका प्रशासन देत नाही.
- अशोक जानराव, कामगार नेते, सोलापूर महानगरपालिका.
-----------
ड्रेनेजचे काम करताना अनेक सफाई कामगारांचा मृत्यू झाला. त्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य दिले जात नाही. कितीही बळी गेले तरी सोलापूर महानगरपालिका प्रशासनात सुधारणा होत नाही. फक्त देंगे दिलायेंगे असाच कारभार महापालिकेला आहे.
- सफाई कामगार
--------
महापालिकेला फक्त काम होण्याशी मतलब आहे. लोक मेले काय...जगले काय काही फरक पडत नाही. मेल्यावर फक्त दु:ख व्यक्त करतात, मदत करू असे म्हणतात. मात्र यापुढे कोणाचाही जीव जाणार नाही याबाबत काय उपाययोजना करायचे यावर कोणीच बोलत नाही. हे चुकीचे आहे.
- सफाई कामगार