धक्कादायक; सोलापूर शहरातील २५० धोकादायक इमारतीत हजारो रहिवासी राहतात बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 12:37 PM2021-06-09T12:37:07+5:302021-06-09T12:37:12+5:30
मनपाचेही दुर्लक्ष- मरण्याची हौस नाही पण पर्यायी जागा नसल्याची खंत
सोलापूर - शहराच्या विविध भागांत अनेक धोकादायक इमारती आहेत. यामध्ये चाळींची अवस्था बिकट आहे. महापालिकेच्या नगररचना कार्यालयाने सुमारे २५० इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. अद्यापही सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळा काही दिवसांवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालयांमार्फत धोकादायक इमारतींची माहिती संकलित केली जाते. मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी धोकादायक इमारती शोधून त्यांची दुरुस्ती करणे, अतिधोकादायक असेल तर पाडकाम करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. विभागीय कार्यालयांकडून यासंदर्भात अहवाल मागविण्यात येतो. काही विभागीय कार्यालयांकडून पुरेशी माहिती मिळत नाही. गेल्या दीड महिन्यात संकलित केलेल्या माहितीनुसार जवळपास २५० धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. यातील चार-पाच इमारतींचा धोकादायक भाग हटविण्यात आला आहे. एक-दोन ठिकाणी पूर्णच पाडकाम झाले आहे. उर्वरित लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
मध्यवर्ती भागात सर्वांत जास्त इमारती
धोकादायक इमारतींची एकूण संख्या आणि त्यामधील रहिवाशांची संख्या मनपाकडे उपलब्ध नाही. या माहितीचे रेकॉर्डही अपडेट नाही. नवी पेठ, उत्तर कसबा, कन्ना चौक, भवानी पेठ, बाळीवेस परिसर या भागांत सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत. जुन्या वाड्यांमध्ये अजूनही लोक राहत आहेत. या इमारतींमध्ये वसाहती, शासकीय कार्यालये, प्रार्थना स्थळांचाही समावेश आहे.
नवी पेठ परिसरात अनेक जुन्या वाड्यांमध्ये लोकांची दुकाने आहेत. मालक आणि भाडेकरू यांच्यात न्यायालयीन वादही सुरू आहेत. सलग दोन वर्षे एका इमारतीचा भाग कोसळत होता. पालिकेने तो हटविलाही. अजूनही काही धोकादायक इमारती आहेत. हे वाद मिटल्याशिवाय डागडुजी होणार नाही.
- विजय पुकाळे, सचिव, नवी पेठ व्यापारी असोसिएशन.
आम्ही आमच्या चाळीमध्ये चार पिढ्यांपासून राहतोय. आम्हाला जागा मालक इमारतीची डागडुजी करून देईल म्हणून आम्ही घर सोडले नाही. आम्हीच डागडुजी करून घेत आहोत. पावसाळ्यात भीती वाटते; पण राहायला दुसरी जागा नाही म्हणून अडचण आहे.
- अनिल माळगे, रहिवासी.
महापालिकेच्या माध्यमातून धोकदायक इमारतीमधील मालकांना वेळोवळी नोटिसा देण्यात आल्या आहेत. आमच्याकडून अतिधोकादायक इमारतींच्या पाडकामाची कारवाई सुरूच आहे. जून महिन्यात या कारवाईला वेग येईल.
- झाकीरहुसेन नायकवाडी, सहायक अभियंता, मनपा